भाविकांविना पोलीस बंदोबस्तात येराड यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:42+5:302021-04-29T04:30:42+5:30
कोयनानगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपेठ येराड (ता. पाटण) येथील श्री येडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या उपस्थितीऐवजी ...
कोयनानगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपेठ येराड (ता. पाटण) येथील श्री येडोबा देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या उपस्थितीऐवजी पोलीस बंदोबस्तात सुरू झाली. गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येडोबा देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेपासून सुरू होते. पाच दिवस चालणारी यात्रा गतवर्षीपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे प्रशासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आली असून, मोजक्या लोकांमध्ये धार्मिक विधी करण्यात येत आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या यात्रेस मंगळवारी सायंकाळी देवाला अश्वारूढ पोशाख चढवून दीपमाळ पेटवून सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटे देवाचा लग्नसोहळा, दुपारी बारा वाजता छोटा छबिना मोजके मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस असून, दुपारी मोठा छबिना, धार घालणे व रात्री बारा वाजता रिंगावणाचा विधी होणार आहे.
जिल्ह्यातील मोठी यात्रा असल्याने यात्रेकडे जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, पाटण तालुका प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी देवस्थान समिती यात्रा कोरोना नियमांचे पालन करत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे.
(कोट..)
पाटण पोलीस स्टेशनने मंदिर परिसरात व मंदिराकडे जाणारे रस्ते व कऱ्हाड-चिपळूण रोडवर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावत मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
येडोबा यात्रेच्या बंदोबस्तासाठी ५ अधिकारी, पोलीस ५२, १७ होमगार्ड असा फौजफाटा तैनात केला आहे.
- एन. आर. चौखंडे, पोलीस निरीक्षक, पाटण
फोटो २८ कोयनानगर
येडोबा मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे हे उपस्थित पोलिसांना सूचना देत आहेत.