पुसेगावचे ग्रामदैवत भैरोबा देवाची यात्रा साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:33+5:302021-05-24T04:37:33+5:30
पुसेगाव : येथील ग्रामदैवत श्री भैरोबा देवाची यात्रा पुसेगाव ग्रामस्थ दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी करतात. पण यंदा कोरोनाची वाढती ...
पुसेगाव : येथील ग्रामदैवत श्री भैरोबा देवाची यात्रा पुसेगाव ग्रामस्थ दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी करतात. पण यंदा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता, शनिवारी ही यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
येथील श्री हनुमान मंदिरात पुसेगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरोबा देवाचे स्थान आहे. ग्रामरक्षणासाठी, रोगराई मिटवणारी तसेच भक्तांचे विविध संकटसमयी रक्षण करणाऱ्या या देवाची महती पुराण धर्मग्रंथातही सांगितली जाते. दरवर्षी मे महिन्यात यात्रा काळात श्री हनुमान मंदिरासमोर भव्य मंडप उभारुन पुसेगाव ग्रामस्थ यात्रेनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करतात. मंदिरासमोर विधीवत झेंडा उभारुन प्रत्यक्ष यात्रेला प्रारंभ होतो. मंदिरात श्री भैरोबा देवाला अभिषेक घालून प्रतिमेची पूजा-अर्चा केली जाते. या यात्रेनिमित्त घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य तयार करुन श्री भैरोबा देवाला सर्व लोक नैवेद्य दाखवतात. सायंकाळी पाच वाजता झेंडा मिरवणुकीने ग्रामप्रदक्षिणेसाठी प्रयाण करतो. यावेळी गावातील सुवासिनी जागोजागी नैवेद्य दाखवून पूजा करतात. घोडे, बँडपथक, झांजपथक, ढोल-ताशाच्या निनादात मिरवणूक सुरु असताना, ग्रामस्थ झेंड्यावर गुलालाची उधळण करतात व ‘भैरोबाच्या नावानं चांगभलं’चा गजर करत देहभान विसरुन नाचतात. यात्रेदिवशी दिवसभर महाप्रसादाचे वाटप केले जाते. मिरवणूक विसर्जनाने यात्रेची सांगता होते. पण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी होणारी ही यात्रा यावर्षी अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.