यशवंत बँकेला अडीच कोटींचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:38 AM2021-04-10T04:38:01+5:302021-04-10T04:38:01+5:30
कराड : नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला २.५० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय ...
कराड :
नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात यशवंत बँकेला २.५० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा एकत्रित व्यवसाय ३३३ कोटी इतका झाला असून, यामध्ये १८९ कोटींच्या ठेवी, तर १४४ कोटींची कर्जे वितरीत केली आहेत. बँकेची गुंतवणूक ५३ कोटी इतकी झाली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे बाजारपेठेत मंदीचे वातावरण राहूनही बँकेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा मिळवण्यात सातत्य राखले आहे. बँकेत प्रत्येक ठेवीदारास मिळणारे ५ लाखापर्यंतचे ठेव विमा संरक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कोविडच्या काळातसुद्धा बँकेने आपले कामकाज अखंडपणे चालू ठेवत ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र व जलद सेवा दिली आहे.
बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूर या जिल्ह्यांचे असून, सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने बँकेच्या भागभांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके बँकेने पूर्ण करून सन २०१९-२० या मागील आर्थिक वर्षासाठी बँकेस शासकीय लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळवला होता. याही आर्थिक वर्षासाठी बँकेने आवश्यक ती सर्व प्रमाणके पूर्ण केली आहेत. ठेव, कर्जे, भागभांडवल, गुंतवणूक या सर्वात वाढ करत मागील वर्षीच्या तुलनेत एनपीएचे प्रमाण कमी करण्यात बँकेला यश आले आहे.
सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक व पतसंस्थांसाठी ठेवीच्या व कर्जांच्या आकर्षक योजना मागील वर्षात बँकेने राबविल्या; त्यास ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नव्या वर्षात छोट्या उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांना ATM, मोबाईल बँकिंग व QR कोड द्वारे व्यवहार अशा अनेक सोयी देण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. आपल्या भक्कम पायावर आगामी सर्व आर्थिक बदलांना सामोरे जाण्यास बँक सक्षम असल्याचे चरेगावकर म्हणाले.
कर्जवसुलीसाठी काही कर्जदारांवर व कामात हयगय करणाऱ्या काही कर्मचारी वर्गाबाबत कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र, यामुळे वसुली चांगली झाली. यापुढेही यात सातत्य राखले जाऊन ठेवीदारांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिली जाईल, असेही चरेगावकर यांनी सांगितले. (वा प्र )
फोटो - शेखर चरेगावकर