यशवंतराव यांनीही साजरी केली होती सैनिकांसोबत दिवाळी
By admin | Published: November 2, 2016 12:07 AM2016-11-02T00:07:19+5:302016-11-02T00:07:19+5:30
पंतप्रधान मोदी यांचा सीमेवरील दिवाळीच्या फोटोबरोबर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही सीमेवरील सैनिकांबरोबरील दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले.
कऱ्हाड : काश्मीरच्या सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. दररोज एखादा दुसरा भारतीय जवान शहीद झाल्याची बातमी कानावर येत आहे. अशा परिस्थितीत सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनच्या सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली अन् लाखो भारतीयांना माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आठवण आली. पंतप्रधान मोदी यांचा सीमेवरील दिवाळीच्या फोटोबरोबर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचाही सीमेवरील सैनिकांबरोबरील दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर फिरू लागले.
सध्या पाकिस्तान बरोबर चीनने देखील भारताविरोधातील आपल्या कुरापती वाढविल्या आहेत. सीमेवरील खडाजंगीत भारतीय जवान शहीद होताना पाहायला मिळत आहेत. उरी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. मात्र, त्यांचे वीरमरण वाया न जाऊ देता ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी त्याला चोख उत्तर दिले.
मात्र, तरीही शेजारील काही राष्ट्रांकडून कुरघोड्या थांबलेल्या दिसत नाहीत. अशावेळी सैनिकांचे मनोबल, मनोधैर्य वाढविणे अत्यावश्यक आहे. तीच बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी आपली दिवाळी चीनच्या सीमेवर सैनिकांबरोबर साजरी केली. ही बाब कौतुकाची आहे. अशावेळी ‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला’ या काव्यपक्ती ज्यांच्यासाठी गायल्या जातात. त्या यशवंतराव यांची आठवण प्रकर्षाने होते.
१९६२ मध्ये भारताला अपमानास्पद परिस्थितीत सीमेवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळची राजकीय परिस्थितीही अस्थिर होती. निर्णय क्षमतेचा अभाव जाणवत होता. तेव्हा पंतप्रधान असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले कऱ्हाडच्या सुपुत्राला संरक्षणमंत्री म्हणून बोलावले. हाकेला साथ देत चव्हाण हे संरक्षणमंत्री म्हणून कामाला लागले. पराभवाची कारण मिमांसा शोधली. त्रुटींचा आढावा घेतला. अन् सैन्य दलाच्या पुनर्गठणानंतर सक्षम संरक्षणदल उभे करण्याचे काम केले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी देखील असेच सीमेवर जाऊन सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली होती. नरेंद्र मोदी तीच वाट चोखाळत आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मनोबल वाढविण्याचा प्रयत्न : पंतप्रधान मोदींबरोबर यशवंतराव यांचे सैन्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री म्हणून केलेले काम, घेतलेले निर्णय खरच इतरांच्या अभ्यासासाठी योग्य आहेत. त्यांनीही संरक्षणमंत्री असताना सीमेवर सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.
- मोहनराव डकरे,
सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र, कऱ्हाड