यशवंतरावांच्या जन्मघरात स्वच्छतागृहच नाही!
By admin | Published: January 4, 2017 11:41 PM2017-01-04T23:41:33+5:302017-01-04T23:41:33+5:30
पर्यटक नाराज : देवराष्ट्रेत स्वच्छतेला खो, लांबून येणाऱ्या लोकांची गैरसोय
अतुल जाधव ल्ल देवराष्ट्रे
पुरातन विभागाच्या ताब्यात असलेल्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघरात शौचालय नसल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे येथील जन्मघर पुरातन विभागाने २००१ मध्ये ताब्यात घेतले. या घराच्या डागडुजीसाठी शासनाने दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीच्या माध्यमातून पुरातन वास्तू जतन करण्याच्या हेतूने पुरातन विभागाने पूर्वीच्या वास्तूप्रमाणे वास्तू उभी केली. त्यानंतर हे जन्मघर महाराष्ट्र प्राचीन वास्तू संगोपन योजनेंतर्गत मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला संगोपनासाठी देण्यात आले आहे. मात्र ही वास्तू पुरातन विभागाच्या ताब्यात असल्याने यशवंतराव प्रतिष्ठानला डागडुजीसह अन्य कामे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
यशवंतरावांचे जन्मघर पाहण्यासाठी महाराष्ट्रातून यशवंतप्रेमी येथे भेट देत असतात. या घरातील तैलचित्रे, संग्राह्य छायाचित्रे, पुरातन वास्तू, पुस्तके हे सर्व पाहिल्यावर पर्यटकांचे समाधान होते. मात्र लांबून येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय व स्वच्छतागृहांची सोय नसल्यामुळे याबद्दल पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.