तांबीच्या वाघजाई महाकाली देवीची यात्रा साध्या पद्धतीने होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:55+5:302021-03-07T04:35:55+5:30
परळी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार कोयना पुनर्वसित तांबी (ता. सातारा) येथील वाघजाई महाकाली देवीची वार्षिक यात्रा ...
परळी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार कोयना पुनर्वसित तांबी (ता. सातारा) येथील वाघजाई महाकाली देवीची वार्षिक यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार असून, भाविकांना यात्रा काळात तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. तरी भाविकांनी यात्रेच्या कालावधीत दर्शनासाठी येण्याचे टाळावे, असे अवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तांबीच्या वाघजाई महाकाली देवीची वार्षिक यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भरते. यात्रेला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात; मात्र यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाच्या सूचनेनुसार यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. यात्रा काळात ११ ते १३ मार्च असे तीन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असणार असून, मंदिर परिसरात गर्दी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दुकाने लावण्यावरही बंदी असून, इतर गावच्या पालख्या, सासनकाठ्या व मिरवणुकीवरही बंदी आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करून यात्राकाळात दर्शनासाठी येण्याचे टाळावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.