औंध येथील श्रीयमाई देवीची यात्रा रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:37+5:302021-02-05T09:05:37+5:30
औंध : येथील श्री यमाईदेवीची यात्रा रद्द करण्यात आली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि. २८ व शुक्रवार, ...
औंध : येथील श्री यमाईदेवीची यात्रा रद्द करण्यात आली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि. २८ व शुक्रवार, दि. २९ रोजी औंधमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, तसा लेखी आदेश खटाव-माणचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.
याबाबत जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, श्री यमाईदेवीच्या रथोत्सव व यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक औंध येथे येण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, हे सर्व रोखण्यासाठी या रोगाचा होणारा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी औंध गावात पूर्णपणे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशान्वये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एकत्र येऊन मिठाई वाटप करणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे यासही बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवार, दि. २९ रथोत्सवाच्या मुख्य दिवशी औंध गावातील सर्व आर्थिक व्यवहार, दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तरी वरील आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्याबरोबर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार केवळ पारंपरिक पद्धतीने पौषी उत्सवातील छबिना आणि रथोत्सवाचा धार्मिक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केले आहे.
२७श्रीयमाई देवी