यवतेश्वर घाटातील भिंतीचे काम युध्दपातळीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 06:05 PM2021-06-11T18:05:50+5:302021-06-11T18:08:16+5:30
Kas Pathar Satara : सातारा - कास मार्गावर यवतेश्वर घाटातील पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंतीचे काम बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरू आहे. या कामामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पेट्री /सातारा : सातारा - कास मार्गावर यवतेश्वर घाटातील पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंतीचे काम बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरू आहे. या कामामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या सातारा - कास मार्गावर वाहनांची सतत रेलचेल सुरू असते. सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर अत्यावश्यक सेवा सुरू असून, भविष्यात कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन झाल्यानंतर पुन्हा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रहदारी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या मार्गावरील यवतेश्वर घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असते.
या दरडी कोसळून कधी-कधी वाहतूकदेखील ठप्प होत असते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होऊन डोंगरावरून वाहणारे पाणी रस्त्यावर येते. त्याचबरोबर या पाण्यासमवेत बारीक खडी, माती, मुरूम रस्त्यावर वाहिल्याने वाहनचालकांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होते. तसेच रस्तादेखील उखडतो. त्यामुळे या मार्गावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.
दरम्यान, निम्म्या भागात रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. रस्ता खराब होऊ नये तसेच वाहनचालकांना वाहने चालवताना कोणताही अडचण निर्माण होऊ नये. अतिपर्जन्यवृष्टीने डोंगरावरून वाहून आलेले पाणी रस्त्यावरून न वाहता, त्या पाण्याला डोंगरानजीक असलेल्या चरीतून व्यवस्थित जावे, यासाठी पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंतीचे काम गेल्या महिनाभरापासून युद्धपातळीवर सुरू आहे.