येवा, साताऱ्यात ‘मिनी कोकण’ आसा!
By admin | Published: March 13, 2015 10:04 PM2015-03-13T22:04:33+5:302015-03-14T00:01:11+5:30
कष्टकऱ्यांचं सहजीवन : अजिंक्यताऱ्याच्या तीव्र चढावर वसलीय कोकणी लोकांची वसाहत
सचिन काकडे -सातारा -: परशुरामाची कोकणभूमी डोंगरदऱ्यांची. जाळल्याशिवाय उगवणार नाही, हा खुद्द परशुरामांनीच दिलेला शाप. कष्टप्रद जीवन अंगवळणी पडलेलंं. पोट नेईल तिकडं जायचं, पडेल ते काम करायचं आणि मुख्य म्हणजे एकत्र राहायचं हा खास कोकणी बाणा. अजिंंक्यताऱ्याच्या कुशीत तीव्र चढावर पाच-पंचवीस कुटुंबं अशीच एकगठ्ठा राहतायत. खरंतर या सगळ्या कुुटुंबांचं ‘घर’ एकच आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात पूर्वीपासूनच अनेक जाती-धर्मांच्या व्यक्ती गुण्यागोविंदाने राहत आहे. येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीतही कोकणातील काही कुटुंबांनी आपली वसाहत वसविली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी कोकणातील एक कुटुंब याठिकाणी स्थायिक झाले. परिस्थितीशी चार हात करीत या कुटुंबानं आपल्या हक्काचं घर उभारलं. आणि बघता-बघता याठिकाणी ऐंशी ते शंभर कोकणवासीयांची एक छोटी वसाहत निर्माण झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील केशव चापोळी, दाभोळे, बेलकरवाडी, शिवगणवाडी, खांदारे, बोरुले, नवलेजंगवाडी अशा गावांतील पाच-पंचवीस कुटुंबे याठिकाणी आज गुण्यागोविंदाने राहत आहेत. दिवाळी, दसरा, कोजागिरी, रंगपंचमी वर्षाकाठी येणारे सर्व सण ही कुटुंबे एकसंधपणे साजरी करतात. एवढंच काय, लग्न कार्यापासून ते चांगल्या, वाईट प्रसंगातही ही कुटुंबे एकमेकांचा हात मात्र सोडत नाहीत. या वसाहतीमधील काही व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत. तर काही युवक व्यवसाय व काही शिक्षण घेत आहे. येथील महिलादेखील आपल्या संसाराचा गाडा ओढत-ओढत बचतगटाच्या माध्यमातून लघु उद्योग करीत आहेत. विशेष म्हणजे अजिंक्यताऱ्यावर असणाऱ्या मोरांचा सांभाळ करणारी ‘मोरांची आई’ ललीता केसव याही याच वसाहतीत राहतात.वर्षाच्या शेवटी म्हणजे नववर्षाला वसाहतीमधील नागरिक प्रत्येकाकडून वर्गणी गोळा करतात आणि एकत्र स्रेहभोजनाचा आनंद घेतात.
कोकणवासीयांचा ‘कोकणरत्न’
या वसाहतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे श्री गणेशाचे मंदिर. सुमारे आठ लाख रुपये वर्गणीतून बांधण्यात आलेल्या या मंदिराचे नामकरण ‘कोकणरत्न’ असे करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिराकडे पाहिले तरी कोकणाची जाणीव होते. वसाहतीमधील नागरिक, युवक व महिलांनी अहोरात्र कष्ट करून हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात असणारी दशभुजा रूपातील गणेशाची मूर्ती सुमारे आठशे किलो वजनाची आहे. येथील नागरिक या ‘कोकणरत्ना’ची नित्यनियमाने पूजा करतात.
रुग्णासाठी खास खुर्ची
कोकणवासीयांची वसाहत अजिंक्यताऱ्याच्या तीव्र चढावर वसली आहे. यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीस खाली आणताना अनेक अडचणी येत असत. यावर उपाय म्हणून येथे राहणाऱ्या मोहन शिवगण यांनी आजारी व्यक्तीची ने-आण करण्यासाठी विशिष्ट अशी एक खुर्ची बनविली आहे. जेणेकरून काही नागरिकांना खुर्ची व्यवस्थित पकडता येईल. आजही वेळेप्रसंगी या खुर्चीचा वापर येथील नागरिक करतात.