बचतगट उत्पादनांचे संमेलनातच व्यापाऱ्यांकडून वर्षाचे बुकिंग; सातारा जिल्हास्तरावर पहिलाच उपक्रम
By नितीन काळेल | Published: December 22, 2023 07:08 PM2023-12-22T19:08:20+5:302023-12-22T19:08:54+5:30
जिल्हा परिषदेत खरेदीदार-विक्रेता संमेलन
सातारा : उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने ग्रामीण बचत गटांच्या उत्पादनांना खात्रीशीर बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेत पहिले जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन झाले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये ६२ विक्रेते गट तर २२ खरेदीदारांनी सहभाग नोंदवला. तर संमेलनातच खरेदीदारांकडून उत्पादनाला ऑर्डर मिळाली हे विशेष.
संमेलनाचे उद्घाटन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा अभियान व्यवस्थापक मार्केटिंग सूरज पवार, मनोजकुमार राजे, स्वाती मोरे, संजय निकम आदी उपस्थित होते.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी घुले म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरिबी निर्मूलनासाठी उमेदमार्फत सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. बचत गटांनीही गुणवत्तेबरोबर पॅकेजिंग व लेबलिंगवर भर दिल्यास खात्रीशीर बाजारपेठ मिळण्यास मदत होईल.
प्रकल्प संचालक संतोष हराळे म्हणाले, ‘उमेद’च्या माध्यमातून उत्पादन करणारे बचत गट विक्रेते आणि साताऱ्यातील खरेदीदारांना संमेलनाच्या माध्यमातून जोडण्यासाठी दुवा म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा काम करीत आहे. जिल्हास्तरावरील हा पहिलाच नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य ‘उमेद’च्या माध्यमातून करणार आहे.
संमेलनात ११ तालुक्यातील दर्जेदार उत्पादन असणाऱ्या ६२ गटांनी विक्रेता म्हणून सहभाग घेतला. तर साताऱ्यातील नामांकित २२ खरेदीदारांनी सहभागी होत विक्रेते गटांबरोबर करार करून ऑर्डरही दिल्या. तांदूळ, गीर गायीचे तूप, नाचणी, इन्स्टंट पीठ, सेंद्रिय गूळ, काकवी, पेढे, लस्सी, कढीपत्ता चटणी, फळे व भाजीपाला, मशरूम बिस्किटे, पंचगव्य उत्पादन, वाघा घेवडा, गांडूळ खत, आवळा कँडी, कागदी कलाकृती, लाकडी घाण्यावरील तेल, मध, मसाले, फिनेल, लोणचे, गुलकंद, मिलेट्स कुकीज, शतावरी, साबण, हळद, नाचणी आदी नावीन्यपूर्ण उत्पादने घेऊन विक्रेते, बचत गट सहभागी झालेले होते. या संमेलनाचे अंकुश मोटे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती मोरे यांनी सूत्रसंचालन तर संजय निकम यांनी आभार मानले.
९ गटांना ११ खरेदीदारांकडून संमेलनातच ऑर्डर..
या संमेलनात रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आलेला होता. यामध्ये ९ बचत गटांना खरेदीदारांकडून संमेलनातच ऑर्डर मिळाल्या. तसेच जिल्ह्यातील उमेद संलग्न ११ महिला शेतकरी उत्पादक कंपन्याबरोबर शेती करण्यासाठी दोन कंपन्यांनी करार केले आहेत.