एक वर्षानंतर महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:38 AM2019-12-20T10:38:58+5:302019-12-20T10:40:09+5:30
सैदापूर, (ता. हामदाबाद) येथील वर्षभरापूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाचे गूढ उलगड्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले, असून हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी एका युवकासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली.
सातारा : सैदापूर, (ता. हामदाबाद) येथील वर्षभरापूर्वी महिलेच्या झालेल्या खुनाचे गूढ उलगड्यात सातारा तालुका पोलिसांना यश आले, असून हा खून आर्थिक व्यवहारातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी एका युवकासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली.
सत्तार नन्नु शेख (रा.लातूर, सध्या रा. सुतारवाडी, पुणे) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरालगत असणाऱ्या हामदाबाज येथील माती परीक्षण केंद्रात मिना आंनदराव देसाई (वय ५०) या राहत होत्या. त्या एका दवाखान्यात आयाचे काम करीत होत्या. त्यांच्या घराचे बांधकाम सत्तार शेख याने केल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांच्यात आर्थिक व्यवहार होत होते.
त्यातूनच झालेल्या वादामुळे संयिताने रविवार दि. २९ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिना यांचे दोन्ही हात व पाय प्लास्टिकच्या चिकट पट्टीने बांधले. त्यानंतर तोंडास प्लास्टिकची पिशवी बांधून गळ्याभोवती चिकट पट्टी बांधून त्यांचा खून केला होता.
या घटनेची तक्रार मृत मिना यांची मुलगी पूनम शशिकांत शेलार (वय २९, रा. तामजाईनगर, करंजे) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून व इतर पुराव्यांच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, संशयितांनी कोणताही ठोस पुरावा घटनास्थळी ठेवला नव्हता. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या.
खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुतारवाडी (पुणे) येथून सत्तार शेख या संशयिताला बेड्या ठोकल्या. त्याने मिना यांचा खून केल्याची कबुली दिली असून, या खूनात त्याच्या सोबत एक अल्पवयीन मुलगाही होता. या दोघांनी मिना यांच्या खूनासोबत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ट्रॅक्टर चोरल्याची कबुलीही पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दादा परिहार, राजु मुलाणी, राजेश वंजारी, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार, सागर निकम, नितीनकुमार थोरात, नीलेश जाधव, महेंद्र पाटोळे यांनी केली.