मायणीतील सिमेंट बंधाऱ्यात वर्षभर पाणी, एकजुटीची क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:08 AM2020-06-23T11:08:17+5:302020-06-23T11:11:51+5:30
दुष्काळी भागामध्ये शासनामार्फत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये तसेच लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या माती बांधमध्ये बाराही महिने पाणीसाठा होत आहे. यामुळे हे सिमेंट बंधारे व माती बांध दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरदान ठरत आहेत. पाणी शिल्लक असल्याने पिके चांगले घेता येत आहेत.
संदीप कुंभार
मायणी : दुष्काळी भागामध्ये शासनामार्फत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये तसेच लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या माती बांधमध्ये बाराही महिने पाणीसाठा होत आहे. यामुळे हे सिमेंट बंधारे व माती बांध दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरदान ठरत आहेत. पाणी शिल्लक असल्याने पिके चांगले घेता येत आहेत.
खटाव तालुक्याच्या पूर्व-उत्तर भागामध्ये कोणतीही पाणी योजना नाही. पावसाचे प्रमाणही खूप कमी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शासनामार्फत काही वर्षांपासून या ठिकाणी प्रत्येक नैसर्गिक ओढे नाल्यांवर साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाअंतर्गत या दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये शेकडो सिमेंट बंधारे तयार झाले आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण, रोजगार हमी योजना तसेच पाणी फाउंडेशन उपक्रमांतर्गत येथील माळराण, डोंगर उतार व मोकळ्या जागेमध्ये लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या माती बांध तयार करण्यात आले आहेत.
सिमेंट बंधारे व माती बांधामध्ये गतवर्षी अवकाळी पावसामुळे पाणी साठले होते. साठलेले पाणी मोठ्या प्रमाणात मुरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांना बाराही महिने पुरेसे पाणी मिळाले.
या भागातील बहुतांशी सिमेंट बंधाऱ्यात आठ ते दहा महिन्यांपासून पाणीसाठा दिसत होता. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे सिमेंट बंधाऱ्यामध्ये पुन्हा पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच माती बांध व तयार केलेले नालाबांध, पाझर तलाव यामध्ये ही पाणीसाठा निर्माण होऊ लागला आहे.
डोंगर कपारीत वसलेल्या पाचवडसारख्या गावामध्ये २०१८ मध्ये शासनामार्फत पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी सलग अठरा महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत लागला होता. मात्र, गतवर्षी मार्च-एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसहभागातून व शासनाच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. यात जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मोठा पाणीसाठा निर्माण झाला. लाखो लिटर पाणी मुरले. त्यामुळे यंदा टँकर लागला नाही. पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच या भागातील नैसर्गिक ओढे नाल्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसातच वाहू लागले आहे.
- माणिक महाराज घाडगे,
पाचवड
जलसंधारणाची कामे प्रेरणादायी
शासनाच्या सहकार्यातून बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे तसेच लोकसहभागातून झालेल्या विविध जलसंधारणाच्या कामामुळे दुष्काळी भागातील हे बदललेले चित्र खरोखरच एक प्रेरणादायी व आशावादी असले तरी शासनाने या भागात कायमस्वरूपी व पाण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
केवळ एकाच गावात टँकर
यावर्षी भागामध्ये शासनाला यावर्षी अनफळे गावाचा अपवाद वगळता कोणत्याही गावात टँकरची गरज भासली नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील हे सिमेंट बंधारे, मातीबांध, पाझर तलावांमध्ये बाराही महिने पाणीसाठा राहिल्याने हे उपक्रम दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी फायदेशीर ठरत आहेत.