यंदाची निवडणूक जिल्हाध्यक्षांना कडवट
By admin | Published: February 28, 2017 11:38 PM2017-02-28T23:38:46+5:302017-02-28T23:38:46+5:30
घडतंय बिघडतंय : कुठे स्वत:ला झटका तर कुठे नातेवाइकांना फटका
प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाड
जिल्ह्यात जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुका अटीतटीच्या पाहायला मिळाल्या. सत्तेच्या सारीपाटावर राष्ट्रवादीने गजर केलाय; पण बऱ्याच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना या निवडणुका मानवलेल्या दिसत नाहीत. कुठे स्वत: जिल्हाध्यक्षांना झटका तर कुठे त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना फटका बसलेला दिसतोय. त्यामुळे यंदाची ही निवडणूक त्यांच्यासाठी कडवटच बनली आहे.
राज्यात सत्तेत सहभागी असणारा पक्ष म्हणजे शिवसेना! सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे शिवसेनेचे, पाटण विधानसभा मतदार संघाचे आमदार शंभूराज देसाई शिवसेनेचे अन् पाटण तालुक्यातील धडाडीचे नेतृत्व हर्षद कदम जिल्हाप्रमुख शिवसेनेचेच! पालकमंत्री शिवसेनेचे असल्याने जिल्ह्यात शिवसेना किती वाढली हा संशोधनाचा विषय. पण त्याही पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मल्हारपेठ गटातून शिवधनुष्य उचललेल्या हर्षद कदमांना पराभवाची चव चाखावी लागलीय.
राजकारणात, निवडणुकीत जय-पराजय तर ठरलेलाच असतो. पण हर्षद कदमांचा पराभव हा विरोधकांनी नव्हे तर सेनेचे आमदार शंभूराज देसार्इंनीच केल्याने या पराभवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कदमांच्या विरोधात पाटण तालुका विकास आघाडीच्या ‘पवारां’ना उभे करून त्यांच्या हातात ‘विजया’ची ‘अंगठी’ देसार्इंनीच घातलीय हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. येथे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे मतदानरूपी काटेही ७ हजार ७७४ पर्यंत पोहोचल्याने हर्षद कदमांचा धनुष्यबाण फक्त ५ हजार ६३६ मतांपर्यंतच जाऊन थांबला. त्यामुळे कदमांच्या चेहऱ्यांवरचा ‘हर्ष’ निघून गेला आहे. पण अशा कडवट परिस्थितीत त्यांनी मिळविलेली मते एका सच्चा शिवसैनिकाला साजेशी आहेत. हेही तितकेच खरे. राज्य अन् देशाच्या सत्तेत सहभागी असणारा दुसरा पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया ! या पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी ‘कमळा’च्या चिन्हावर आपल्या पत्नी ‘हेमलता’ यांना वाई तालुक्यातील यशवंतनगर गणातून रिंगणात उतरविले होते. पण येथे राष्ट्रवादीच्या सुनीता कांबळेंच्या घड्याळाने गजर केला. अन् हेमलता तार्इंनी हातात घेतलेलं ‘कमळ’ काही फुललंच नाही.
यशवंत विचाराचा वारसा सांगणारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा पक्ष म्हणजे काँगे्रस. या निवडणुकीत उमेदवारीच्या अंतिम यादीवरून ‘हात’ फिरवायलाच काँगे्रसच्या नेत्यांनी उशीर केला. अनेक तालुक्यांतून काँगे्रस या निवडणुकीत हद्दपार झाल्याचे दिसले. तर काही ठिकाणी नाही म्हणायला अस्तित्व दिसत आहे. कऱ्हाड तालुक्यात तर काँगे्रसचे दोन आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर आनंदराव पाटील विधान परिषद सदस्य आहेत. तरीही तालुक्यात काँगे्रसला अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही. भरीस भर म्हणून जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांचे पुत्र ‘प्रताप’ यांनी तांबवे जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढविली. परंतु उंडाळकरांच्या विकास आघाडीच्या प्रदीप पाटलांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे आनंदराव पाटील यांच्या समर्थकांत नाराजी आहे.
सुनील मानेंच्या आनंदावर विरजण
अवघ्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर जिल्हा परिषद निवडणुकीत पाहायला मिळतोय. विधान परिषद निवडणुकीमध्ये शेखर गोरेंचा झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारीत पदाचा राजीनामाही देऊ केला होता. मात्र, तो स्वीकारला नव्हता.
त्यानंतर झालेल्या या परीक्षेत सुनील माने पास झाले असले तरी त्यांच्या कोरेगाव तालुक्यात त्यांच्या रहिमतपूर नजीकचा वाठार किरोलीचा गट काँगे्रसच्या भीमराव पाटलांनी मताधिक्यांनी जिंकल्याने मानेंच्या आनंदामध्ये विरजण पडले आहे.