यंदाचा गणेशोत्सव पूरग्रस्तांच्या मदतीसाठी! - सातारकरांनी पुढं येणं महत्त्वाचं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 08:36 PM2019-08-17T20:36:40+5:302019-08-17T20:39:45+5:30
समाजाताील विविध स्तरांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू असला तरी आपल्या शेजारील या बांधवांना समाजातून अधिक मदतीची आवश्यकता आहे.
प्रगती जाधव-पाटील
सातारा : क-हाड-पाटणसह सांगली आणि कोल्हापूरला पुराचा पडलेला विळखा आताशी कुठं सैल झाला आहे. शेजारील जिल्ह्यातील बंधू-भगिनी त्यांच्या आयुष्याची कमाई पाण्यात वाहून गेल्याचं दु:ख घेऊन पुन्हा नव्या हिमतीने आणि जोमाने उभं राहण्याच्या तयारीत असताना आपण उत्सव साजरा करावा, हे संवेदनशील सातारकरांच्या मनाला न पटणारं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून या बांधवांना मदत करण्यासाठी सातारकरांनी पुढं येणं महत्त्वाचं आहे.
गत सप्ताहात सलग दहा दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाने सातारा जिल्ह्यातील कºहाड आणि पाटण तालुक्यांना पुराच्या पाण्याने वेढले होते. अशीच गंभीर परिस्थिती कोल्हापूर आणि सांगलीमध्येही झाल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे कोसळून गेले होते. समाजाताील विविध स्तरांतून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू असला तरी आपल्या शेजारील या बांधवांना समाजातून अधिक मदतीची आवश्यकता आहे.
ऐतिहासिक साता-याने आजवर प्रत्येक संकटाशी दोन हात करून इतरांनाही मदत केल्याचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी तमाम सातारकरांनी पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे. पुरातून सावरणा-या आपल्या भावंडांना त्यांच्या पायावर सक्षम उभं राहण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवातील अतिरिक्त खर्च टाळून ती मदत रुपाने पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन ‘लोकमत’ करत आहे. साताºयातील मंडळांनी अतिरिक्त खर्चाला फाटा देऊन त्यातून शिल्लक राहिलेली रक्कम पूरग्रस्त भागातील गावांना देऊन सणांच्या माध्यमातून माणुसकी जोपासावी, अशी अपेक्षा आहे.
संकटग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर कायम धावून जातात. यंदाचा उत्सवातील खर्च कमी करून तो पूरग्रस्तांकडे देण्याचा ‘लोकमत’च्या वतीने राबविण्यात येणारा उपक्रम स्तुत्य आहे. यात बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गुरुकुल स्कूलही सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
- राजेंद्र चोरगे, समाजसेवक
उत्सव काळातील खर्च कमी करून पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभं राहण्यासाठी बळ देणं अधिक महत्त्वाचं आहे. सातारकर याबाबत संवेदनशीलही आहेत. ‘लोकमत’च्या उपक्रमात सातारकर आणि गणपती मंडळांचा सक्रिय सहभाग मिळेल, यात शंका नाही.
- कन्हैय्यालाल राजपुरोहित, व्यावसायिक