वय वर्षे नऊ अन् सुवर्ण पदके वीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:42 PM2018-11-13T22:42:20+5:302018-11-13T22:42:29+5:30
जगदीश कोष्टी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खाणं, खेळणं, मनसोक्त कार्टून पाहणं अन् वेळ मिळालाच तर अभ्यास करणं. ...
जगदीश कोष्टी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खाणं, खेळणं, मनसोक्त कार्टून पाहणं अन् वेळ मिळालाच तर अभ्यास करणं. हा दिनक्रम सरासरी नऊ वर्षीय मुला-मुलींचा असतो. यामुळे पालक चिंतेत दिसतात; पण साताऱ्यातील कनिष्का माने या चिमुरडीनं कमालच केलीय. तिने राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत यंदा हॅटट्रीक केली. तिने वीस सुवर्ण, दोन ब्राँझ, दोन रजत पदकांची कमाई केली.
कनिष्काचे वडील चंद्रकांत माने हे साताºयात कपडे शिलाईचे काम करतात. ते मूळचे डबेवाडी येथील असून, व्यवसायाच्या निमित्ताने साताºयात स्थायिक झाले. मंगळवार तळे परिसरात राहत असताना माने दाम्पत्य कनिष्काला घेऊन दररोज सकाळी शिवाजी उदय मंडळाकडे फिरायला जात. तेथे खेळणारी मुलं पाहून कनिष्कानेही खेळात नाव कमवावे.
कनिष्काला वयाच्या सहाव्या वर्षी मैदानावर घेऊन जाऊ लागले. तिचा कल पाहून कनिष्काला आर्चरीत घालण्याचा निर्णय घेतला. कामामुळे वडील तिला मैदानावर घेऊन जाऊ शकत नाही. ही जबाबदारी आईने उचलली. दररोज सकाळी सात ते साडेअकरा आणि सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ती सराव करते. तिला न चुकता आई ने-आण करते.
कनिष्काला सुरुवातीला लाकडी धनुष्यबाण घ्यायचा होता. लाकडी बोची किंमत नऊ हजार रुपये होती. हा खर्च झेपणारा नव्हता. तेव्हा आईने मंगळसूत्र गहाण ठेवून बो आणला. लाकडी बोवर खेळत असली तरी राष्ट्रीय स्पर्धेसाठी रिकव्ह बोची आवश्यकता असते. त्याची किंमत सरासरी दीड लाखाच्या घरात आहे. तिचा राष्ट्रीयस्तरावरील खेळ पाहून राष्ट्रीय पंच रणजित तामले यांनी स्वत:कडील रिकव्ह बो दिला आहे.
प्रशिक्षक शिवशंकर चोरट, राष्ट्रीय प्रशिक्षक रणजित चामले, गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्काने पदके मिळविली आहेत.
शांत स्वभावाचा फायदा
कनिष्काचा स्वभाव लहानपणापासून अबोल. ती सतत शांत असायची, कोणाशी फार बोलायची नाही. तिच्या याच स्वभावाचा फायदा कनिष्काला आर्चरी खेळताना होतो. आसपास कितीही गोंधळ असला तरी लक्ष्यापासून तिची नजर हटत नाही. त्यामुळे तिला स्पर्धेत सहज यश मिळते.