राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यंदा घमासान
By admin | Published: January 11, 2017 11:36 PM2017-01-11T23:36:43+5:302017-01-11T23:36:43+5:30
जोरदार सराव : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यामुळे निवडणूक टस्सल होणार; सर्वच पक्ष पेटून उठलेत
सातारा : गेल्या दीड दशकात सातारा जिल्ह्यात निर्विवादपणे सत्ता राखणाऱ्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी काँगे्रस, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर पक्षांनी जोरदार व्यूव्हरचना केली आहे. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जोरदार घमासान युद्ध होणार, हे निश्चित आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २७ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्रे दाखल केली जाणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन छाननी होणार आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्याच दिवशी केंद्रनिहाय मतदार यादीची प्रसिद्धी केली जाणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असल्याने इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीला मागील वर्षी धक्क्यावर धक्के बसले होते. खासदार उदयनराजे भोसले यांचा गट राष्ट्रवादीशी फारकत घेऊन आहे. विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला पाणी पाजल्याने काँगे्रसचा उत्साह दुणावला आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपचे स्थानिक नेतेमंडळी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये शिरकाव करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली असल्याने जिल्ह्यात लगीनघाईचे वातावरण आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मंडळींनी जातपडताळणीसह इतर सोपस्कार आधीच करून ठेवले असले तरी बहुतांश उमेदवारांना धावपळ करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेमध्ये राखीव प्रवर्गातून २५ सदस्य प्रतिनिधीत्व करणार आहेत. तर जिल्ह्यातील ११ पंचायत समितींमध्ये एकूण ४८ सदस्य राखीव प्रवर्गामधील असणार आहेत. एकूण ७३ सदस्य राखीव प्रवर्गातून निवडायचे आहेत. काही मतदार संघांमध्ये आधीपासूनच राखीव आरक्षणाचा अंदाज बांधला गेला होता. त्या ठिकाणी उमेदवार निश्चितीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, ज्या ठिकाणी अनेक वर्षे जिल्हा परिषद अथवा पंचायत समित्यांचे मतदारसंघ आरक्षित झाले नव्हते, त्याठिकाणी अनेकजण गाफील होते.
जिल्हा परिषदेसाठी बिदाल, खटाव, मायणी, वाठार स्टेशन, भुर्इंज, लिंब, काळगाव, काले, पुसेगाव, निमसोड, बावधन, भिलार, पाटखळ, वारुंजी, पाल, कार्वे, तळदेव या जिल्हा परिषद गटांमध्ये इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण आहे. औंध, वनवासवाडी, नागठाणे, गोडोली, हेळवाक, उंब्रज, सैदापूर या मतदारसंघांत अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण आहे. तर वाई तालुक्यातील यशवंतनगर गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. या व्यतिरिक्त पंचायत समित्यांमध्ये ४८ सदस्य आरक्षित प्रवर्गातील असणार आहेत. हे सदस्य मिळविण्यासाठी राष्ट्रवादी, काँगे्रससह इतर पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)
जातपडताळणीची सत्त्वपरीक्षा
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातपडताळणी करणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याने या उमेदवारांना सत्त्वपरीक्षा द्यावी लागणार आहे. जिल्हानिहाय जातपडताळणी कार्यालय करण्याचा निर्णय लालफितीत अडकल्याने उमेदवारांना कोल्हापूरच्या वाऱ्या कराव्या लागणार आहेत.
शरद पवार आज साताऱ्यात
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते गुरुवार, दि. १२ रोजी दुपारी १२.३० वाजता कारखाना डिस्टिलरी व इथेनॉल प्लँटच्या आधुनिकीकरणाचा आणि अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले वगळता राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वांनाच बोलावणे धाडण्यात आले आहे. या कार्यक्रमात शरद पवार काय घोषणा करतात, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
अध्यक्षपदाची या गटांना संधी
शिरवळ, कुडाळ, म्हसवे, शेंद्रे, वर्णे, तरडगाव, हिंगणगाव, गिरवी, पिंपोडे बुद्रुक, ल्हासुर्णे, वाठार किरोली, आंधळी, मल्हारपेठ, म्हावशी, मुंद्रुळकोळे, मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, येळगाव, विंग या जिल्हा परिषद गटांमध्ये खुल्या गटाचे आरक्षण आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदही खुले असल्याने या गटांतील निवडून आलेले सदस्य अध्यक्षपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे.