नैसर्गिक मृत्यूच्या अंत्यसंस्काराला येईनात खांदेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:11+5:302021-05-17T04:37:11+5:30
शिरवळ : कोरोनाबरोबरच आता नैसर्गिकरीत्या मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे नातेवाईकही अंत्यसंस्काराकडे ...
शिरवळ : कोरोनाबरोबरच आता नैसर्गिकरीत्या मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे नातेवाईकही अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवू लागले आहे. कोरोनाच्या काळात माणुसकी हरवत चालल्याची परिस्थिती सध्या खंडाळा तालुक्यात निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात आता तरुणाईच अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावू लागली आहे.
जिल्हा प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांबरोबरच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागले आहे. उपचारासाठी बेड मिळत नसल्याने चित्रपटगृहांप्रमाणे रुग्णालयांच्या बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले दिसून येत आहे. अशा विदारक परिस्थितीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीची वार्ता मिळताच नागरिक भलतीच धास्ती घेऊ लागले आहेत. सद्यस्थितीत एखाद्या व्यक्तीचे नैसर्गिक अर्थात हृदयविकार, वृद्धापकाळ, अपघात अथवा इतर कोणत्याही नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाल्यास नागरिकांच्या व नातेवाईकांच्या काळजात धस्स होत आहे.
कोरोनाची धास्ती इतकी वाढली आहे की नातेवाईकदेखील नैसर्गिक मृत्यू झालेल्या आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात नाहीत. इतकेच नव्हे तर दाहीदिशा भटकंती करणारे नागरिक अथवा नातेवाईक मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घराकडे जाणेदेखील टाळत आहेत. त्यामुळे नैसर्गिक मृत्यूच्या अंत्यविधीलाही खांदेकरी मिळत नसल्याची परिस्थिती सध्या खंडाळा तालुक्यात उद्भवली आहे.
अशा संकट काळात शिरवळमधील तरुणांनी जातीपातीच्या भिंती तोडून अंत्यसंस्कार करण्याकरिता एक पाऊल पुढे टाकले आहे. शिरवळचे माजी उपसरपंच आदेश भापकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश गिरमे, काका राऊत, रविराज दुधगावकर, दीपक मगर, शहिदभाई तांबोळी, साहिल काझी, समीर काझी, आसिफभाई मुजावर, जावेद बागवान, रमेश चव्हाण, सुनील चव्हाण व मुराद पटेल हे सर्वजण सार्वजनिक शिवमहोत्सव समिती व ७८६ यूथ क्लबच्या माध्यमातून आपले दायित्व पूर्ण करीत आहेत. संकट काळात तरुणांची माणुसकी धावून आली असून, त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(कोट)
कोरोनाच्या काळात सध्या संपूर्ण जग त्रस्त आहे. नैसर्गिक मृत्यूलाही सध्या नागरिक साशंकतेने पाहताना दिसत आहेत. त्यामुळे धर्माच्या पलीकडे जात तरुणाई धाडस दाखवित आपले कर्तव्य पार पाडत आहे.
- आदेश भापकर, माजी उपसरपंच, शिरवळ
(कोट)
कोरोनाची धास्ती असल्याने अनेकजण अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवू लागले आहेत. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आम्ही अंत्यसंस्कारासाठी पाऊल पुढे टाकले आहे. आमचे हे कार्य पुढे सुरूच राहणार आहे.
- असिफभाई मुजावर, सामाजिक कार्यकर्ता
फोटो : १६ मुराद पटेल