येळगावकरांचा राष्ट्रवादीला रामराम
By admin | Published: July 6, 2014 11:25 PM2014-07-06T23:25:18+5:302014-07-06T23:25:47+5:30
भाजपमध्ये जाणार : लवकरच करणार घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसला ‘राम-राम’ करण्याचा निर्णय घेतला. मायणी येथे त्यांची निवडक विश्वासू कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर ते या निष्कर्षाप्रत आले.
तीनच दिवसांपूर्वी डॉ. येळगावकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन माण विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे स्पष्ट करतच ‘जनता हाच माझा पक्ष’ असे जाहीरपणे सांगितले होते. त्याचीच प्रचिती रविवारी आली.
डॉ. येळगावकर रविवारी दिवसभर मायणीमध्ये होते. यावेळी त्यांनी निवडक दोनशे कार्यकर्त्यांसमवेत आगामी राजकीय वाटचालीबाबत चर्चा केली. या बैठकीस सुरेशशेठ शिंदे, श्रीमंत पाटील, बाबा गोसावी, सचिन माळी, संभाजी इंगळे, संजय इनामदार, विकल्प शहा आदी उपस्थित होते.
या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांनी मोठ्या अपेक्षेने आपण राष्ट्रवादीत गेलो असलोतरी पाणीप्रश्नावर आपली निराशा झाली असल्याचे ठामपणे सांगितले. पाणीप्रश्न सोडवायचा असेलतर आपल्याला पुन्हा भाजपला जवळ करावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनंतर डॉ. येळगावकर यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेत राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि भाजपमध्ये प्रवेशाच्या अनुषंगाने मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)