येळकोट येळकोट जय मल्हार; भंडाराच्या उधळणीत खंडोबा-म्हाळसा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:33 PM2024-01-23T12:33:31+5:302024-01-23T12:33:44+5:30
उंब्रज : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, पिवळा धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत लाखो वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत ...
उंब्रज : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, पिवळा धमक भंडारा व खोबऱ्याच्या तुकड्यांची उधळण करत लाखो वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. कऱ्हाड तालुक्यातील पाल येथे गोरजमुहूर्तावर हा सोहळा झाला. पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण, सूर्यास्ताची किरणे यामुळे विवाहाच्या बोहल्यासह संपूर्ण पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे चित्र दिसत होते.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळ्यासाठी लाखो वऱ्हाडी भाविक सोमवारी पाल येथे दाखल झाले होते. संपूर्ण यात्रा कालावधीत कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी महिन्यापासून केली होती.
परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या पूर्ण सागवानी स्वमालकीच्या रथातून मिरवणुकीची सुरुवात कऱ्हाड पंचायत समितीचे माजी सभापती प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून झाली. या सोहळ्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील प्रमुख मानकरी हे आपल्या मानाच्या गाड्यासह आले होते. यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट असा गजर करत होते.
देवळात आरती झाल्यानंतर प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून ते रथात बसले. सर्व मानाचे गाडे, मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघाली. ही शाही मिरवणूक तारळी नदीवर बांधण्यात आलेला नवीन पूल ओलांडून विवाह मंडपात (बोहल्यावर) पोहोचली. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींचा मानपानाचा विधी उरकण्यात आला. गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला.
पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
लग्नसोहळ्यासाठी खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे घेऊन मुख्य मानकरी देवळातून बाहेर पडतात. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ही गर्दी नियंत्रित करणे ही मुख्य जबाबदारी पोलिस प्रशासनाची असते. यंदा या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासनाला यश आले. सातारा जिल्हा पोलिस दलातील विविध विभागातील पोलिस यंत्रणा आपल्यावर दिलेली जबाबदारी चोख पार पाडताना दिसून येत होते. त्यांच्यासोबत महसूल विभागाचे कर्मचारी व पोलिस पाटील संघटनाही कार्यान्वित झालेली दिसली.