येरळाचा पूल २५ दिवसांपासून पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:36 PM2019-10-13T23:36:26+5:302019-10-13T23:36:30+5:30
वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला ...
वडूज : गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्या पावसाने येरळवाडी तलाव अनेक वर्षांनी पूर्ण क्षमतेने भरले आणि येरळा नदीचे पात्र सध्य:स्थितीला दुथडी भरून वाहत आहे. या नदीपात्रावरील मोराळे गावाच्या हद्दीत निमसोड व मायणी या मोठ्या गावांना जोडणारा पूल गेल्या २५ दिवसांपासून अद्याप पाण्यात असून, लोकांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी पुलाची उंची वाढवण्याची मागणी लोकांमधून होत आहे.
कलेढोण, मायणीहून निमसोड, औंध, रहिमतपूर यामार्गे साताऱ्याला जाणारा हा रस्ता वाहनचालकांना सोयीस्कर व जवळचा आहे. पुसेगाव किंवा पुसेसावळीमार्गे साताºयाला जाणाºया रस्त्यापेक्षा निमसोडमार्गे जाणारा हा रस्ता सध्या चांगल्या अवस्थेत आहे. व्यावसायिकदृष्ट्या या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु मोराळे गावाच्या नजीक असणाºया पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने अनेक वर्षांतून वाहिलेल्या येरळा नदीचे उसळून वाहणारे पाणी उरात धडकी भरवत आहे.
सध्या पूल बंद असल्याने म्हासुर्णेमार्गे मायणी किंवा वडूजमार्गे मायणी असा १० ते १५ किलोमीटरचा प्रवास आहे. काही वर्षांपूर्वी हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर बांधलेल्या पुलाचे काम कमी उंचीचेच करण्यात आले. परंतु सध्या नेर येथील तलाव व येरळवाडी तलाव यासह खटाव, सिद्धेश्वर कुरोली, वडूज, कातरखटाव, पळसगाव या भागातून येणाºया अनेक नदीपात्रात व ओढ्यात अनेक बंधारे भरून वाहू लागले आहे.
येरळा नदीच्या पात्रात येणाºया पाण्याचे प्रमाण खूप आहे. अद्याप पावसाने उसंती घेतली नसल्याने आणखी अनेक दिवस हा पूल पाण्याखालीच राहण्याची शक्यता आहे. या पुलाची उंची वाढवण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे .