येरळेचा श्वास गुदमरतोय!

By admin | Published: November 17, 2014 09:06 PM2014-11-17T21:06:34+5:302014-11-17T23:16:41+5:30

अतिक्रमणे वाढली : चिंचोळी पात्रात घाणीचे साम्राज्य

Yerla breathing suffocated! | येरळेचा श्वास गुदमरतोय!

येरळेचा श्वास गुदमरतोय!

Next

वडूज : प्राचिन कालीन ‘वेदावती’ व सध्याची ‘येरळा’ नदी खटाव तालुक्याची वरदायिनी असल्याने ७० टक्के गावांची तहान ही नदी भागवते. सध्या वडूज परिसरातील येरळा नदी पात्रात अतिक्रमणे वाढून मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याने येरळेचा श्वास गुदमरतोय, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पुरातन काळात या नदीला अनन्य साधारण महत्त्व होते. या नदी पात्रावर येरळवाडी येथे एक टीएमसीचा तलाव बांधला असून, या तलावातून खटाव तालुक्यात प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याच्या योजना आहेत. आजही या नदीच्या तीरावर शिवलिंग असलेली हेमाडपंथी महादेव मंदिर आहेत. नदीला अनेकवेळा महापूर येऊनही आज २१ व्या शतकात ही मंदिरे जशीच्या तशी तग धरून आहे. नदीच्या तीराकाठी आयुर्वेदिक झाडाझुडपांचा व वनस्पतींचा साठा उपलब्ध होता. याच नदीच्या काठावर बसून पूर्वी ऋषीमुनी ध्यानस्थ बसत असल्याचा उल्लेख बखरीमध्ये पाहावयास मिळतो. त्यामुळे येरळा नदीला इतिहास प्राप्त झाला असून, सद्य:स्थितीत हे महत्त्व कमी होताना दिसत आहे ते केवळ मानवनिर्मित प्रदूषणामुळे.
नदीच्या पाण्यात निर्माल्य टाकणे, हे नित्याचेच बनले आहे. नदीकाठी वीटभट्टीधारकांचे अतिक्रमण होऊन नदीचे पात्र चिंचोळे बनले आहे. वडूज शहरात काही जुनी घरे पाडून त्याची माती, दगड व कचरा या नदीपात्रात आणून टाकल्याने मूळ पात्र सापडणे महाकठीण बनले आहे. अवकाळी पावसामुळे नदीवरील बंधारे तुडुंब भरले आहेत. बंधाऱ्याच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याला योग्य दिशा न मिळाल्याने हे पाणी येरळा तलावात पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. तर तलावात गेलेले पाणी अशुद्ध असल्याने तलावातील मासे मृत्यू पावत आहेत. हेच पाणी वडूज, मायणी, खातवळ, औंध प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेद्वारे तालुक्यातील ७० टक्के गावांना सोडण्यात येत आहे.
दूषित पाणी फिल्टर करण्याची क्षमता ठराविक गावात उपलब्ध असल्याने उर्वरित गावांना या दूषित पाण्याचा फटका बसत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)

बोकाळलेले अतिक्रमण व नदीचे झालेले लहान पात्र यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात या नदीचा समावेश केला तर नदी मोकळा श्वास घेऊ शकेल.

Web Title: Yerla breathing suffocated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.