योगसाधनेत रमले लाखो सातारकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:39 PM2019-06-21T23:39:30+5:302019-06-21T23:39:36+5:30

सातारा : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शेकडो सातारावासीयांनी शुक्रवारी एकत्र येत येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योगसाधना ...

Yoga | योगसाधनेत रमले लाखो सातारकर !

योगसाधनेत रमले लाखो सातारकर !

googlenewsNext

सातारा : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शेकडो सातारावासीयांनी शुक्रवारी एकत्र येत येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योगसाधना केली.
‘आपल्या जीवनशैलीमुळे आयुष्यमान कमी होत चालले आहे. निरोगी आयुष्यासाठी व आयुष्यमान वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगासने केली पाहिजेत,’ असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी केले.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील आयुष विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक आदी उपस्थित होते.
‘प्रत्येकाने दिवसाची सुरुवात ही व्यायामाने केली पाहिजे. कमीत कमी दररोज २० मिनिटे रोज चालण्याचा व्यायाम तरी केला पाहिजे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग केला पाहिजे. यामुळे ताणतणाव तर कमी होतो, त्याचबरोबर आपले आरोग्यही चांगल्या पद्धतीने राहते. मुलांनी अभ्यासाबरोबर शारीरिक व्यायामालाही महत्त्व दिले पाहिजे. योगामुळे मानसिक विकास होतो. यासाठी प्रत्येकाने योग जीवनाचा अविभाज्य घटक बनवा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
यावेळी विविध योगा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगाची आसने करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास श्ािंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक सुजित शेडगे, माजी नगरसेवक डॉ. रवींद्र भारती (झुटिंग) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात योगाबाबत कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तहसीलदार सोनिया घुगे, वैशाली राजमाने यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्ट आॅफ लिव्हिंगचे सुनील पोतदार, संजय खटावकर यांनी प्रशासकीय काम करत असताना योगासनाच्या माध्यमातून ताण-तणावापासून कसे दूर राहता येईल व योगाचे महत्त्व सांगून योगासनाचे प्रात्यक्षिकेही यावेळी करून दाखविले.

Web Title: Yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.