इंदवली तर्फ कुडाळच्या सरपंचपदी योगिता शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:46 AM2021-02-17T04:46:30+5:302021-02-17T04:46:30+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या इंदवली तर्फ कुडाळ या गावच्या सरपंचपदी योगिता शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. ...
कुडाळ : जावळी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या इंदवली तर्फ कुडाळ या गावच्या सरपंचपदी योगिता शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे तालुक्यातील पहिल्या वकील महिला सरपंच होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे.
महिला आरक्षणामुळे आज अनेक ठिकाणी महिलांना संधी मिळत आहे. नुकत्याच झालेल्या सरपंचपदाच्या निवडीतही कुडाळ भागातील कुडाळ, सर्जापूर, सरताळे, बेलावडे, इंदवली तर्फ कुडाळ, बामणोली तर्फ कुडाळ, आदी बहुतांश ठिकाणी सरपंचपदी महिलांची वर्णी लागलेली आहे. जावळी तालुक्यातील निवड झालेल्या महिला सरपंच उच्चशिक्षित आहेत. घरची जबाबदारी पेलत आता गावच्या कारभाराला विकासाचे नवे रूप देण्यासाठी यांच्याकडून प्रयत्न होणार आहेत.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तलावातील गाळ काढणे आणि तलाव सुशोभित करणे, स्मशानभूमी हे सर्व प्रश्न त्या मार्गी लावणार आहेत. याचबरोबरीने गावात ग्रामसचिवालयाची इमारत उभी करून सर्व शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे.
(कोट)
राजकारणात येण्यामागचा प्रत्येकाचा वेगळा उद्देश असू शकतो. गावच्या सरपंचपदी महिला आरक्षण पडले. यातच गावाने एकी दाखवून निवडणूक बिनविरोध केली. यामुळे जावळीतील पहिली महिला वकील सरपंच होण्याचा मान मिळाला याचा आनंद आहे. अशातच माझ्या गावची परिस्थिती पाहता गावाच्या सर्वांगीण विकासाची भूमिका ठेवूनच यापुढे कार्य करणार आहे.
- योगिता शिंदे, सरपंच, इंदवली तर्फ कुडाळ
१६ योगिता शिंदे