तुम्ही तर आमंत्रणावर जगणारे महाराज !

By admin | Published: December 26, 2016 11:08 PM2016-12-26T23:08:07+5:302016-12-26T23:08:07+5:30

शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना प्रतिटोला : निमंत्रण म्हणजे तोंड बंद ठेवण्यासाठी तोंडात ठेवलेले लॉलिपॉप

You are the chef at the invitation! | तुम्ही तर आमंत्रणावर जगणारे महाराज !

तुम्ही तर आमंत्रणावर जगणारे महाराज !

Next

सातारा : ‘आमंत्रण आणि निमंत्रणावर जगाणारे तुम्ही महाराज आहात. तुमचे राजकारण हे घराणे, महाराज आणि दहशत यावरच अवलंबून असते, हे तुम्हीच दिलेल्या पत्रकावरून सिद्ध होत आहे. छत्रपतींचे वंशज आहे, हे सिद्ध करण्यासाठी उदयनराजेंना सरकारचा दाखला लागत असल्याने आश्चर्य वाटत आहे. शिवस्मारकाच्या समारंभासाठी तुमचे नाव पत्रिकेत टाकले, तुम्हाला बोलावले खरे; पण तुमची व्यासपीठावर शोभेची वस्तू म्हणून प्रतिष्ठापना करण्यात आली. समारंभात तुम्ही तोंड बंद ठेवावे म्हणूनच तुम्हाला निमंत्रण देऊन तोंडात लॉलिपॉप ठेवला आहे,’ असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांना लगावला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सोयीस्कर बगल देऊन तुम्ही नेहमीप्रमाणे बोलबच्चनगिरी केली आहे. तुमच्या पोपटपंचीला जनता कधीही भूलणार नाही. सर्व मुद्द्यांवर बोलला; पण शेतकऱ्यांच्या जमिनीवर जबरदस्तीने लावलेले शिक्के हटवण्याबाबत तुमचे मौन का? जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्यांतील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार का?,’ असा खडा सवालही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, ‘शिवस्मारक भूमिपूजन समारंभासाठी निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले म्हणून तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात हे सिद्ध झाले, असे तुम्ही दाखवत आहात. राजमाता सुमित्राराजे भोसले यांचा मी नातू आहे. अभयसिंहराजे भोसले यांचा मी मुलगा आहे. याशिवाय मी सातारा-जावळी मतदार संघाचा आमदार आहे हे सातारकरांसह महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहिती आहे. त्यामुळे मी कोण आहे, याचा दाखला तुम्ही देण्याची गरज नाही. मुंबईतील शिवस्मारकाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे, सुरेश प्रभू यांच्यासारख्या नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. तुम्हाला मात्र एखाद्या फ्लॉवर पॉट सारखे शोभेची वस्तू म्हणून स्टेजवर ठेवण्यात आले. छत्रपतींचे थेट तेरावे वंशज; पण तुम्हाला साध्या शुभेच्छा देण्याचीही संधी दिली गेली नाही. तुम्हाला निमंत्रण दिले म्हणजे तुमचा मोठेपणा वाढला असे तुम्हाला वाटत असेल; पण निमंत्रणाचे लॉलिपॉल तुमच्या तोंडात ठेवून तुमचे तोंड बंद करण्यात आल्याचे तुम्हाला कसे समजणार? काल परवापर्यंत तुम्हाला मोदी कोण हे माहीत नव्हते. त्यांच्या धोरणांच्या विरोधात मोर्चाची नौटंकीही तुम्ही केली. त्याच मोदींच्या पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून तुम्हाला निमंत्रण पाठवले की लगेच त्यांना मोदी साहेब म्हणू लागलात.
त्याच तुमच्या मोदी साहेबांनी कोल्हापूरच्या छत्रपतींनंतर तुमचे नाव घेतले, जाहीर कार्यक्रमात तुम्हाला कोपऱ्यात बसवले. तरीही तुमचा तथाकथित स्वाभिमान उफाळून आला नाही.
‘औरंगजेबाच्या दरबारात मागच्या रांगेत उभे केले म्हणून स्वाभिमानाने निघून येणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि त्याच महाराजांचे थेट वंशज म्हणून मिरवून घेणारे, लाळघोटेपणा करत निमूट कोपऱ्यात बसणारे लाचार उदयनराजे कुठे? हा फरक देशातील जनतेला त्याचदिवशी दिसला आहे. मोदींनी तुमच्याशी बोलायचे सोडाच पण, चुकूनही पाहिले नाही. त्यामुळे मोदी साहेबांशी बोलणं झालं आहे, वगैरे सांगून धमक्या कोणाला देता? थापा मारायचे धंदे आता बंद करा, थाप मारून थापाड्या जातो हे सातारकरांना पुरते माहीत झाले आहे,’ अशी सणसणीत चपराक आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांना लगावली.
‘जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी मतदार जास्त आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचा तुम्हाला आता पुळका आलाय. माण, खटाव तालुक्यांत पवनचक्क्या कंपन्यांसाठी शेतकऱ्यांवर दबाव कोणी टाकला? टोल नाक्यावरील लूट आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्क्यांबाबत ‘ब्र’ सुद्धा तुम्ही काढला नाही. महसूलमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय काम केले? उलट त्यांच्या जमिनीवर स्वत:चे आणि मातोश्रींचे नाव चढवून शिक्के मारले. शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. महसूलमंत्री बनून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यापलीकडे तुम्ही काय केले आहे? महाबळेश्वर, सातारा आणि जावळी तालुक्यांतील शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार का? याचे उत्तर द्या,’ असे आव्हान आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले. (प्रतिनिधी)


एका विजयावर हुरळून जाऊ नका
‘केवळ फोटोसेशन आणि प्रसिद्धीसाठी नोटाबंदीला विरोध करणाऱ्या, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्या उदयनराजेंची पंतप्रधानांसमोर जीभ चालली नाही, याचे आश्चर्य वाटत आहे. राजकारणातील चढ-उतार आम्हाला शिकवण्यापेक्षा तुम्हीच ते लक्षात ठेवा. एका विजयावर हुरळून जाऊ नका. यापुढे अनेक मैदाने यायची आहेत. त्या निकालावरून तुम्हाला कळेल चढ-उतार काय असतात ते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले इच्छुकहीनव्हते आणि जर आम्ही पक्षाकडे उपाध्यक्षपदाची मागणी केली असती तर तुमच्या रवी साळुंखेंना उपाध्यक्षपदाच्या खुर्चीजवळही फिरकता आले नसते, हे लक्षात ठेवा,’ असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
नागपूरच्या मोर्चात का दिसला नाहीत
‘जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष या नात्याने आम्ही नोटाबंदीच्या विरोधात सुप्रिम कोर्टात गेलो होतो. यासंदर्भात खासदार म्हणून तुम्ही काय केले? तुम्ही नोटाबंदीच्या विरोधात इथे गल्लीत गोंधळ घालून मोर्चाची नौटंकी केली. आम्ही तुमच्या मोर्चाची हवा काढल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली तुम्हाला मोर्चा स्थगित करावा लागला. मराठा क्रांती मोर्चात पुढे-पुढे राहणारे उदयनराजे नागपूर येथील मराठा मोर्चात का दिसले नाहीत? शिवस्मारक समारंभात पंतप्रधान मोदींना नोटाबंदीबाबत काय बोलला का नाही? त्यांच्या कानावर शेतकऱ्यांच्या व्यथा घातल्या का? समाजसेवक उदयनराजेंनी किमान साताऱ्याच्या मोदी पेढेवाल्यांचे पेढे तरी पंतप्रधान मोदींना द्यायचे होते,’ अशी कोपरखळीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मारली.


व्यक्तीद्वेषाच्या राजकारणातच तुम्हाला रस
नगरपालिकेच्या निवडणुकीत रोखठोक कार्यक्रम घेऊन तुम्ही स्वत:च स्वत:ची पाठ थोपटण्याचा उद्योग केला. त्या कार्यक्रमात तुमचा बगलबच्चा बनकर हाच सर्व प्रश्नांची उत्तरे देत होता. ज्या भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्याला जिल्ह्याच्याच नव्हे तर, राज्याच्या पटलावर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. मात्र, केवळ व्यक्तीद्वेषापोटी तुम्ही भाऊसाहेब महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करत आहात. भाऊसाहेब महाराजांचा तुम्ही किती द्वेष करता हे पेपरबाजीतून दिसत आहे. विकासकामांच्या नव्हे तर, व्यक्तीद्वेषाच्या राजकारणातच तुम्हाला रस असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. खासदार म्हणून तुम्ही काय कामगिरी केली, याचा लेखाजोखा वृत्तपत्रातून मांडण्यात आला आहे. तुम्ही हवापालटासाठी जाता का लोकसभेत जाता हेही त्या वृत्तावरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: You are the chef at the invitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.