तुझं माझं जमेना.. खुर्चीविना करमेना
By Admin | Published: March 13, 2017 10:52 PM2017-03-13T22:52:44+5:302017-03-13T22:52:44+5:30
कारण राजकारण : कऱ्हाडला सभापतिपदाची आज निवड; दादा, बाबा, काका, नाना म्हणतायत...
कऱ्हाड : राजकारणात कोण कुणाचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे आजवर अनेकदा पाहायला मिळाले आहे. राजकीय नेते बऱ्याचदा सोयीची मैत्री करतात. तर कधी गरजेने मैत्रीचा हात पुढे करतात. कऱ्हाड पंचायत समिती निवडणुकीतही कोणा एकाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने गळ्यात गळे तर घालावेच लागणार आहेत. त्यामुळे सध्या दादा, काका, बाबा, नाना ‘जाऊ द्या ना बाळासाहेब...’ असा सूर आळवताना दिसतायत.
पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिल्याने कुणा एका पक्षाला किंवा नेत्याला सत्ता स्थापन करणे अशक्य झाले आहे. येथे राष्ट्रवादीला सात तर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या विकास आघाडीलाही सात जागा मिळाल्या आहेत. तर डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सभापती निवडीवेळी ‘हम सात सात है’चा नारा ऐकायला मिळणार की उंडाळे व रेठरेकरांच्या ‘मैत्रिपर्वाला’ उजाळा मिळणार, याची उत्सुकता आहे.
पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. अतुल भोसले हे तिघेही उत्सुक आहेत. मात्र, सद्य:स्थितीत बाळासाहेब पाटील यांच्या भूमिकेभोवती गणिते फिरताना दिसत आहेत. उंडाळकर-रेठरेकरांचे मैत्रिपर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतच तुटले. त्यामुळे ते लगेचच जुळण्याची शक्यता किती, हा अभ्यासाचा भाग बनला आहे. त्यामुळे या दोन्ही गटांच्या मध्यस्थानी बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क वाढवून आपण सत्ता बनवूया, अशी चर्चा चालविली आहे; पण बाळासाहेब पाटील जुन्या आठवणींना उजाळा देत असल्यामुळे हे सगळेच लोक आता जाऊ द्या ना बाळासाहेब... राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, हे सांगून मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत उंडाळकरांनी उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांना रसद पुरविली होती. तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही उंडाळकरांनी उत्तरेतील गावन्गाव पिंजून काढले. जाहीर सभांमधून आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर टिकांचे आसूड ओढले. शब्दरूपी अस्त्राने झालेल्या जखमा अजुनही ताज्या आहेत. या सर्व आठवणींना आ. बाळासाहेब पाटील उजाळा देत असल्याने दस्तुरखुद्द काका आणि त्यांच्या मध्यस्थांनाही काय बोलावे, हे कळेनासे झाले आहे.
दुसरीकडे भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनाही सत्तेत जावे, असे मनोमन वाटत आहे. मैत्रिपर्व तुटल्याने उत्तरच्या आमदारांसोबत जुळवून घेणे, हा त्यांच्यासमोरचा मार्ग आहे. पण भोसलेंनी उत्तरेवर स्वारी करण्याचा केलेला प्रयत्न बाळासाहेब अजूनही विसरलेले दिसत नाहीत. त्यातच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही अतुल भोसलेंनी उत्तरेत बरेच लक्ष घातल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुतण्याच्या मदतीला काका मदनदादा धावून आलेले दिसतायत. त्यांनीही ‘जाऊ द्या ना बाळासाहेब...’ म्हणत जुन्या गोष्टी सोडून देऊ आणि नव्याने सुरुवात करू या, असा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचाही निरोप घेऊन एक मनोहारी नेता उत्तरच्या आमदारांना भेटल्याची चर्चा आहे; पण कऱ्हाड पालिका निवडणुकीत काँग्रेसने दाखविलेला हिसका बाळासाहेबांना चांगलाच ज्ञात आहे. त्यामुळे ते बाबांच्या निरोपाला किती दाद देतील, हा प्रश्नच आहे. सध्यातरी दादा, काका, नाना, बाबा हे सर्वजण ‘जाऊ द्या ना बाळासाहेब...’ चा सूर काढत असून, उद्या बाळासाहेब ‘चालतंय की’ असं कोणाला म्हणणार, हे पाहावे लागेल.(प्रतिनिधी)
सभापतिपद कुणाला?
पंचायत समिती सभापतिपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. यासाठी राष्ट्रवादीकडे मसूरच्या शालन माळी, उंडाळकरांच्या विकास आघाडीकडे येळगावच्या फरीदा इनामदार तर भाजपकडे कार्वेतील अर्चना गायकवाड अशा तीन दावेदार आहेत; पण कुणाच्या पदरात सभापतिपदाचं दान पडणार, हे होणाऱ्या समीकरणावर अवलंबून असल्याने त्याबाबतही चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेसबरोबरच आघाडी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, कऱ्हाडला काँग्रेसला बरोबर घेऊनही राष्ट्रवादीच्या घड्याळाचा काटा पाहिजे तेवढा पुढे सरकत नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच वाढला आहे.