जग फिरून झाले, जरा देशही फिरून पाहा, राजू शेट्टींचा PM मोदींना खोचक सल्ला
By प्रमोद सुकरे | Published: November 12, 2022 08:18 PM2022-11-12T20:18:32+5:302022-11-12T20:19:04+5:30
"३ महिने वेळ काढून भारत यात्रा करा खरी वस्तुस्थिती कळेल"
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही चांगली बाब आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता जवळजवळ सगळे जग फिरून झाले आहे. त्यांनी आता जरा जवळून देशही फिरून पहावा .म्हणजे त्यांना खरी वस्तूची समजेल अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कराड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, प्रमोद जगदाळे, सांगली जिल्हा अध्यक्ष पोपट मोरे, प्रवक्ते अँड . संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले, राजकारणाचा स्तर सध्या अत्यंत खालच्या पातळीवरती गेलेला आहे. ही बाब लोकांना न पटणारी आहे. चुकीची भाषा वापरणाऱ्यांना जनता योग्य वेळी त्यांची जागाही दाखवतील.
मध्यावधीची शक्यता वाटत नाही- राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे का ?याबाबत विचारता शेट्टी म्हणाले ,हे सगळे सत्तेला लालसावलेले लोक आहेत. ते सत्तेचा पुरेपूर उपभोग घेतील. वाटल्यास त्यानंतर भांडतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीची शक्यता वाटत नाही.
त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय?- सीबीआय ईडीच्या वापराबाबत खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करून ईडीवर ठपका ठेवला आहे. याकडे लक्ष वेधले असता, न्यायालय तीन महिने काय करत होते? त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय? असा सवालही त्यांनी केला.
मी बारीकसारीक संघटनेकडे लक्ष देत नाही- सध्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे देखील ऊस दर प्रश्नी भलतेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारताच शेट्टी म्हणाले, मी सध्या बारीक-सारीक संघटनेकडे लक्ष देत नाही.