राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
By नितीन काळेल | Published: May 12, 2023 07:18 PM2023-05-12T19:18:47+5:302023-05-12T19:20:18+5:30
'भाजपचे मंगळसूत्र बांधून एकत्र नांदले आणि नंतर शरद पवारांचा हात धरुन गेले'
सातारा : ‘भाजपचे मंगळसूत्र बांधून एकत्र नांदले आणि नंतर शरद पवारांचा हात धरुन गेले. मुख्यमंत्री असतानाही मातोश्री कधी सोडली नाही. आता त्यांनी तेथेच आराम करावा आम्हाला नैतिकता शिकवू नये. त्यांनी राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय,’ असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. तर संजय राऊतांचे नाव काढू नका, डिप्रेशनमध्ये माणूस गेलाय, त्यांनीच शिवसेनेला संपवलंय, असा प्रहारही केला.
सातारा येथे उद्योजक परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आले होते. त्यांच्याबरोबर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हेही होते. उद्योजक परिषद झाल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले.
मंत्री राणे म्हणाले, ’साताऱ्यात उद्योग वाढावेत, रोजगार वाढावा तसेच लोकांचेही उत्पन्न वाढण्यासाठी उद्योजक परिषद घेण्यात आली. कारण, जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उद्योग हीच एक व्यवस्था आहे. आता साताऱ्यासाठीही आवश्यक ती मदत मी आणि मंत्री भागवत कराड हे करणार आहोत. कारण, पश्चिम महाराष्ट्रातील हा भाग प्रगत समजला जातो. पण, दरडोई उत्पन्नात तसा दिसत नाही. येथील राजकारण हे उद्योगांकडे वळावे असे वाटते.
'तसे' आम्ही करणार नाही
सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय? यावर मंत्री राणे यांनी निकाल आला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आहे. सर्वत्र आबादीआबाद आहे. विकासकामे सुरू आहेत, असे हसत-हसत सांगितले. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारने नैतिकता असेल तर राजीनामा देऊन निवडणूक घ्यावी, असे आव्हान दिल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर मंत्री राणे यांनी त्यांना घरी बसवले आहे. त्यांनी तेथेच आराम करावा व मातोश्री चांगली ठेवावी. ते मुख्यमंत्री नावालाच होते. २ तासच मंत्रालयात गेले. मातोश्री कधी सोडली नाही. राजीनामा देऊन मुर्खपणा केला. तसे आम्ही करणार नाही.
२०२४ ची निवडणूक जवळच आली आहे. त्यावेळी काय ते बघूया. दुसऱ्यांचा हात धरुन ते गेले तेव्हा त्यांच्याकडे नैतिकता किती आहे, हे दिसून आले आहे, असा टोमणाही मारला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे स्पष्ट केले.
आमदार १२ वर आलेल्याचा अंत जवळ...
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मंत्री राणे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. त्यांचे कोणतेच भाकीत खरे ठरत नाही. सरकार पडणार, आमदार अपात्र ठरणार म्हणाले, पण काय झाले. वेडसर माणूस आहे, त्यांनीच शिवसेना संपवली असे राऊतांवर वाकबाण सोडले. तर त्यांच्याकडे ५६ आमदार होते. आता संख्या १२ वर आली आहे. यामुळे ठाकरे यांचा अंत जवळ आलाय, असेही राणे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री नावालाच...
विधानसभा अध्यक्षांनी महिन्यात अपात्र आमदारांबद्दल निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊ असे ठाकरे गटाने म्हटल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर राणे यांनी त्यांना कायदे माहीत नाहीत. घर कधी सोडले नाही. अध्यक्षाला कालमर्यादा कधी असते का ? त्याचा अभ्यास करावा, असा टोमणेवजा सल्ला ठाकरे यांनी दिला.