पुसेगावला नशीब आजमावताहेत तरुण उमेदवार
By admin | Published: August 2, 2015 10:04 PM2015-08-02T22:04:48+5:302015-08-02T22:04:48+5:30
हायटेक प्रचार : ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच तिरंगी लढत
शेखर जाधव- वडूज -पुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे दिग्गज नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. १७ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात असल्याने आणि तिरंगी लढतीत युवक उमेदवारीमुळे परिवर्तनाची लाट असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे.पुसेगाव येथील नेतेमंडळी व मतदारराजांचे अनोखे नाते याठिकाणी पाहावयास मिळते. समोरासमोर एकमेकांविरोधात उभे ठाकलेले उमेदवारांचा प्रचार पूर्ण ताकदीने; परंतु हसत-खेळत सुरू आहे. याठिकाणी तीन पॅनेलमध्ये कधीच लढत झालेली नाही. परंतु बदलत्या परिस्थितीत लोकशाहीची पाळेमुळे अगदी खोलवर गेल्याने राजकारणातील सत्ता, राजकारण व संधी असे चित्र येथे पाहावयास मिळत आहे.पुसेगावच्या राजकारणात राजकीय पातळीवरील सर्व नेत्यांनी मतदानापुरते राजकारण व नंतर गावचा विकास, असाच कारभार केला. जुन्या राजकारण्याची पद्धती किंवा राजकीय डावपेच बदलले आणि मतदारराजांच्या सुपीक डोक्यातून सत्ता बदलाचे वारे वाहू लागले. आधुनिकीकरणाच्या युगात सतत बदलाचेच वारे वाहत असते. त्यामुळे येथील निवडणुकीत रंगत येत आहे.
शिवाजी वॉर्ड १, धनाजी वॉर्ड २ आणि सेवागिरी वॉर्ड ३ मध्ये काँटे की टक्कर असून, इतर ठिकाणी ही अशीच संमिश्र परिस्थिती आहे. सरपंचपद ओबीसी महिला आरक्षित असल्याने सुशिक्षित महिलांना संधी देण्यात नेत्यांनी धन्यता मानली आहे.
श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेचे पॅनेलप्रमुख माजी उपसरपंच रणधीर जाधव यांनी स्थानिक युवक वर्गाची संघटना स्थापना करून विरोधकांपुढे आव्हान उभे केले आहे. तर श्री सेवागिरी नागरी संघटनेचे प्रमुख काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य मोहनराव जाधव, सुनील जाधव यांनी जुन्या-नव्यांना बरोबर घेऊन राजकीय वातावरण तापविले आहे. माजी आमदार तात्याराव जाधव यांनी गाव कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी पॅनेल टाकून सत्ताधाऱ्यांना मेटाकुटीला आणले आहे.
सोशल मीडियाचा वापर
पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये एकूण तीन पॅनेल समोरासमोर आली असून, वॉर्डमधील लढती लक्षवेधी ठरणार असल्याने सर्व पॅनेल प्रमुख, उमेदवार व कार्यकर्ते प्रचारात व आपले चिन्ह पोहोचविण्यात कोठेही कमी पडत नाहीत. तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मतदाराला मतदानासाठी प्रचार करताना व्हॉट्सअॅप मेसेज व प्रत्यक्ष मोबाइलवरुन संपर्क साधून चिन्ह वधवून घेतले जात असल्याचे चित्रही सध्या पाहावयास मिळत आहे. पॅनेलप्रमुख रणधीर जाधव आणि सुनील जाधव ही रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
सहा वॉर्डात ४९ उमेदवार
एकूण १७ जागांसाठी सहा वॉर्डमधून ४९ उमेदवार रिंगणात असल्याने जरी मतदारांना संभ्रमित करणारी परिस्थिती निर्माण झाली असली तरी तरुणांच्या हातात सत्ता असावी, असा मतदारांचा कौल परिवर्तनाची लाट निर्माण करेल, असेच वातावरण बनले आहे. सर्व पॅनेलप्रमुखांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचून आपला जाहीरनामा व आश्वासने जरी दिली असली तरी मतदानानंतर उमेदवारांचे नशीब उघडणार आहे.