टायर फुटून अपघातात पोतलेचा युवा उद्योजक ठार, कारच्या चिंधड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 21:24 IST2023-05-20T21:23:33+5:302023-05-20T21:24:26+5:30
सहकारी जखमी, कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु

टायर फुटून अपघातात पोतलेचा युवा उद्योजक ठार, कारच्या चिंधड्या
लोकमत न्यूज नेटवर्क, कऱ्हाड: आटके टप्पा ता. कऱ्हाड येथे शनिवारी रात्री स्वीफ्ट गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. या अपघातामध्ये पोतले येथील युवा उद्योजक शरद पाटील हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांचे सहकारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना कृष्णा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोतले येथील ग्रामस्थांच्या कडून मिळालेली माहिती अशी की, शरद पाटील (वय ३५) हे साखर व गूळ याचे होलसेल व्यापारी होते. ते मुंबई व इतर ठिकाणी याची विक्री करत होते. शनिवारी सकाळी व्यवसायाच्या निमित्ताने ते कोल्हापूरला गेले होते. काम उरकून घरी परतत असताना आटके टप्पा येथे गाडीचा पुढचा टायर फुटून त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या एका सहकार्यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची तब्येत स्थिर असल्याचे समजते.
दरम्यान शरद पाटील यांचे पार्थिव रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शरद पाटील यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.
मोठ्या कष्टातून उभारला उद्योग
कऱ्हाड परिसरातील साखर कारखाने आणि गुऱ्हाळ घरांमधील गुळ एकत्रित करुन तो कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी विक्रीचा व्यवसाय हा शरद पाटील यांनी सुरु केला होता. गेल्या दोन चार वर्षात त्यांचा चांगला जम बसला होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्यावरच होती. त्यामुळे पाटील यांच्या नातेवाईकांसह गावावरही शोककळा पसरली आहे.