अपघातात गुडघ्याच्या वाटीचा चुरा झाल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 10:01 PM2022-09-14T22:01:31+5:302022-09-14T22:02:18+5:30

अपघातामध्ये गुडघ्याच्या वाटीचा चुरा झाल्याने नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

young man commits suicide due to depression due to broken kneecap in an accident | अपघातात गुडघ्याच्या वाटीचा चुरा झाल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

अपघातात गुडघ्याच्या वाटीचा चुरा झाल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : अपघातामध्ये गुडघ्याच्या वाटीचा चुरा झाल्याने नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदवली तर्फ कुडाळ, ता. जावळी येथे दि. १३ रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली.

अविनाश दिलीप गोळे (वय २२, सध्या रा. इंदवली तर्फे कुडाळ, ता. जावळी, मूळ रा. पिंपळी, ता. जावळी, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश गोळे आणि त्याचा मित्र डिसेंबर महिन्यामध्ये दुचाकीवरून उंब्रजला परीक्षेला जात असताना शेंद्रेजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात अविनाशचा मित्र जागीच ठार झाला होता तर अविनाश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याच्या वाटीचा चुरा झाला होता. त्यामुळे तो नैराश्यात असायचा. अलीकडे त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणाही होत होती. 

येत्या काही दिवसांत त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. असे असताना मंगळवारी रात्री तो घरातून गावाजवळील स्मशानभूमीजवळ गेला. तेथील पुलाला दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मंगळवारी सकाळी गावात मिळाल्यानंतर नागरिकांनी तातडीने तेथे धाव घेऊन अविनाशच्या गळ्याभोवतीचा फास सोडला. परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने इंदवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत विक्रम भरत घाडगे (वय २६, रा. इंदवली, तर्फे कुडाळ, ता. जावळी) याने मेढा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

‘त्याने’ काॅटवर झोपलेले भासवले

अविनाश हा नेहमी काॅटवर झोपायचा. घरातून निघून जाताना त्याने काॅटवर कोणाला शंका येऊ नये म्हणून कापडी लोड ठेवला. त्यावर चादर ठेवून स्वत: झोपल्यासारखं दिसावं, असं भासवलं. त्यानंतर मच्छरदाणी लावून तो घरातून निघून गेला. सकाळी तो लवकर उठला नाही म्हणून त्याला घरातले लोक उठविण्यास गेले असता चादर काढताच काॅटवर कापडी लोड असल्याचे दिसले. त्यानंतर त्याला शोधण्यास सुरुवात झाली.

मित्राला ‘सॉरी’ म्हणून मेसेज

अविनाशने रात्री एक वाजता त्याच्या मित्राला ‘सॉरी’ म्हणून मेसेज पाठविला. परंतु, हा मेसेज त्या मित्राने सकाळी पाहिला. त्याने आत्महत्यापूर्वी चिठ्ठीही लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्याने ‘मला अपंगाचे जीवन जगायचे नाही. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप काय केलेय. धन्यवाद, थॅक्यू,’ असं लिहिलंय.
 

Web Title: young man commits suicide due to depression due to broken kneecap in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.