मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला सात वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:12+5:302021-03-04T05:15:12+5:30
वडूज : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाळू भीमराव मदने (वय ३५, रा. वावरहिरे, ता. माण) याला वडूज येथील जिल्हा ...
वडूज : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाळू भीमराव मदने (वय ३५, रा. वावरहिरे, ता. माण) याला वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी बाळू मदने याने अल्पवयीन मुलीच्या घरात तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला होता. यातून पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली होती. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून बाळू मदने याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. कवडे यांनी केला. त्यांना हवालदार वाय. एम. जामदार यांनी याकामी मदत केली. आरोपीविरुद्ध सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी जिल्हा न्यायालय वडूज येथे दोषारोपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.के. मलाबादे यांनी बाळू मदने याला दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीस नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात येणार आहे. याकामी सरकार पक्षाच्या वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले.
प्रॉसिक्यूशन स्क्वाॅड दहिवडी पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक शेडगे, दत्तात्रय जाधव, काॅन्स्टेबल जयवंत शिंदे, अक्षय शिंदे यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.
फोटो : ०३ वडूज बाळू मदने
फोटो : वडूज येथे बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी बाळू मदने याला शिक्षा सुनावल्यानंतर त्याला कारागृहात नेण्यात आले.