अमेरिकेत राहणाऱ्या युवकाची बैलगाडीतून वरात!

By admin | Published: December 31, 2016 12:21 AM2016-12-31T00:21:26+5:302016-12-31T00:21:26+5:30

कोपर्डे हवेली : पाश्चिमात्य देशात राहूनही जपली भारतीय संस्कृती; दुर्मीळ आठवणींना उजाळा

A young man in the United States bullock cart! | अमेरिकेत राहणाऱ्या युवकाची बैलगाडीतून वरात!

अमेरिकेत राहणाऱ्या युवकाची बैलगाडीतून वरात!

Next

कोपर्डे हवेली : अमेरिका हा पाश्चिमात्य देश. जिथं राहणीमान, खानपान, सण, समारंभ, उत्सव साजरे करण्याची पद्धत वेगळीच; पण मुळच्या कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथील युवकाने अमेरिकेत राहूनही भारतीय परंपरा जपल्या आहेत. गावाच्या मातीची आठवण ठेवून त्याने गावीच आपला विवाह समारंभ घेतला. तसेच भारतीय संस्कृती आपल्या अमेरिकेतील मित्रांना माहिती व्हावी, यासाठी त्याने आपली वरात चक्क सजवलेल्या बैलगाडीतून काढली.
बदलत्या आणि स्पर्धेच्या युगात सर्वच क्षेत्रांत झपाट्याने बदल होत आहेत. जुन्या गोष्टींची जागा नवीन गोष्टी घेत आहेत. झगमगाटाच्या दुनियेत यांत्रिकीकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, आपण प्रगत आणि पाश्चिमात्य देशात वास्तव्य करीत असलो तरी गावच्या मातीची आठवण ठेवणारे फार थोडेच पाहायला मिळतात. त्यापैकी एक आहेत कोपर्डे हवेली येथील अतुल चव्हाण. बाजार समितीचे संचालक हिंदुराव चव्हाण यांचे अतुल चव्हाण हे सुपुत्र असून, गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत शिक्षण घेऊन तो नोकरी करत आहे. अतुलचे प्राथमिक शिक्षण कोपर्डे हवेली येथे झाले. माध्यमिक शिक्षण कऱ्हाडच्या टिळक हायस्कूलला घेतले. राहुरी विद्यापीठात त्याने कृषी क्षेत्रातील पदवी घेतली आणि पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेला गेला. त्याचे सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने अतुलला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणे अवघड होते. मात्र, त्याची जिद्द पाहून कुटुंबीयांनी कर्ज काढून त्याला पाठवले. घरच्या परिस्थितीची जाण ठेवून अतुलनेही अमेरिकेतील ‘टेक्सास’ विद्यापीठात ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून शिष्यवृत्ती संपादन केली. तेथेच त्याने शिक्षण पूर्ण केले. चांगल्या गुणांनी शिक्षण पूर्ण केल्याने आयटी विभागात त्याला नोकरी मिळाली.
अतुलचा विवाहही कुटुंबीयांनीच ठरवला. लोणंद, ता. खंडाळा येथील बाळासाहेब घाडगे यांची कन्या सुरभी यांना त्यांनी अतुलसाठी पसंत केले. त्यानंतर अतुलने संमती दिली आणि अतुल व सुरभी यांचा विवाह कोपर्डे हवेलीत थाटामाटात झाला. विवाह समारंभात पारंपरिक गोष्टींचा वापर करून ग्रामीण ढंग जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
रात्री वरातही चक्क सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आली. वास्तविक, सध्या ग्रामीण भागातही शहरीकरणाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे वरातीला कार, बग्गी, जीप, ट्रॅक्टर यासारखी वाहने वापरली जातात. मात्र, अतुल आणि सुरभीच्या वरातीला बैलगाडी वापरण्यात आली. बैलगाडीला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर बैलांनाही सजवण्यात आले होते. बैलांच्या शिंगांना शेंब्या लावून रंग दिला होता. पाठीवर झुली घालण्यात येऊन गळ्यात चाळ घातले होते. दुर्मीळ झालेली बैलगाडीतील वरात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)
अमेरिकेतील विवाह पद्धती वेगळी आहे. तेथे सर्व अत्याधुनिक आहे. मात्र, आपली भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ आहे ते येथे आल्यानंतरच समजते. हा विवाह सोहळा अविस्मरणीय आणि पारंपरिक व्हावा, अशी आमची अपेक्षा होती. तसेच हा सोहळा अमेरिकेतील मित्रांना दाखवता यावा यासाठी सर्व सोहळ्याचे आम्ही ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले आहे.
- अतुल चव्हाण

Web Title: A young man in the United States bullock cart!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.