ठाण्यातून पळालेला तरुण महाबळेश्वरात सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:25 AM2021-06-23T04:25:47+5:302021-06-23T04:25:47+5:30
महाबळेश्वर : घरी कोणालाही न सांगता ठाण्यातून शुक्रवार, दि. १८ रोजी बेपत्ता झालेला हर्ष रामू गौडा (वय २०, रा. ...
महाबळेश्वर : घरी कोणालाही न सांगता ठाण्यातून शुक्रवार, दि. १८ रोजी बेपत्ता झालेला हर्ष रामू गौडा (वय २०, रा. शिवाईनगर, ठाणे) या युवकाचा महाबळेश्वर पोलिसांनी शोध घेतला. त्याच्या मित्रांबरोबर त्याला ताब्यात घेऊन त्यांची पुन्हा ठाण्याला रवानगी केली.
याबाबत महाबळेश्वर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हर्ष हा आपल्या कुटुंबाबरोबर ठाण्यातील शिवाईनगरमध्ये राहतो. शुक्रवारी तो ठाण्यातून बेपत्ता झाला. एक दिवस त्याच्या घरच्यांनी तो घरी पुन्हा येईल म्हणून वाट पाहिली, परंतु तो आला नाही. म्हणून हर्षची आई सपना यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार दिली. ठाणे पोलिसांनी हर्षचा शोध सुरू केला तर दुसरीकडे हर्षचा मोबाईल नंबर ट्रॅक केला. हर्षचा मोबाईल त्या दिवशी बंद होता. दोन दिवस ठाणे पोलिसांनी हर्षच्या मित्रांची माहिती गोळा केली. त्या वेळी हर्षचे काही मित्रही शहरात नसल्याचे व त्यांच्या सोबत एक सफेद रंगाची कार असल्याची माहिती मिळाली.
हर्षने मोबाईल दोन दिवसांनी सुरू केला. मोबाईल सुरू होताच त्याचे मोबाईल टाॅवरचे लोकेशन पोलिसांना मिळाले. त्या आधारे ठाणे पोलिसांनी हर्ष गौडा व त्याच्या मित्रांची सर्व माहिती पाचगणीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांना दिली. सोबत हर्ष व त्याच्या मित्रांचा फोटो त्यांच्या सोबत असलेल्या गाडीचा नंबर व सर्वांचे मोबाईल नंबर अशी माहिती पाचगणी पोलिसांना मिळताच त्यांनी परिसरात शोध सुरू केला. दरम्यान, पाचगणी पोलिसांनी सर्व माहिती महाबळेश्वर पोलिसांनाही दिली.
महाबळेश्वर पोलिसांनी शहर व परिसरातील खासगी बंगले, लाॅज व हाॅटेलमध्ये चौकशी सुरू केली.
महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर मेटगुताड गावात एका हाॅटेलबाहेर संबंधित गाडी महाबळेश्वर पोलिसांना आढळली. त्यांनी अधिक चैकशी केली असता हर्ष मित्रांबरोबर महाबळेश्वर येथे सहलीसाठी आल्याचे तपासात समोर आले. महाबळेश्वर पोलिसांनी हर्ष व त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले. सर्व माहिती ठाणे पोलिसांना कळविली. महाबळेश्वर पोलिसांनी पाठविलेले फोटो व माहितीची खात्री पटल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. शहा हे पोलीस पथकासह महाबळेश्वरकडे रवाना झाले. ठाण्याचे पोलीस पथक सोमवारी रात्री उशिरा महाबळेश्वरात दाखल झाले. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करून ठाणे पोलिसांनी हर्ष व त्याच्या मित्रांना सोबत घेऊन पहाटे ठाण्याला रवाना झाले.
आयकार्ड फोटो
२२हर्ष गौडा