तीनशे फूट वजीर सुळक्यावर तरुणाने फडकविला तिरंगा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:40 PM2020-01-25T23:40:25+5:302020-01-25T23:43:25+5:30
डोंगरावरील खडतर आव्हाने पेलत हे गिर्यारोहक दोन तासांनंतर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर सुळका सर करण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले. मात्र, रोहित व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी ‘वजीर’ सर करण्याचा चंग बांधला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी रोपच्या साह्याने हा सुळका अखेर सर केला अन् सुळक्यावर तिरंगाही फडकविला.
सचिन काकडे ।
सातारा : गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा, पाहता क्षणी काळजात धडकी भरवणारा सह्याद्रीचा कडा म्हणजे ठाणे जिल्ह्यातील वजीर सुळका. बुद्धिबळाच्या पटावरील वजिराप्रमाणे ३०० फूट सरळ उंच असणारा हा सुळका कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावचा साहसवीर रोहित जाधव व त्याच्या सहकाऱ्यांनी सर केला आणि तिरंगा फडकविला. निमित्त होतं.. ७१ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचं!
कुमठे येथे राहणाºया रोहित जाधव या तरुणाने किल्ले भ्रमंतीची आवड जोपासली आहे. आतापर्यंत त्याने राजगड, तोरणा, शिवनेरी, सिंहगड असे अनेक किल्ले सर केले आहेत. गड-किल्ले सर करत असतानाच आपण गिर्यारोहण करावं, अशी प्रबळ इच्छा रोहितच्या मनात आली. गिर्यारोहणाचं कोणतंही प्रशिक्षण नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने सर्वप्रथम रायगड जिल्ह्यातील लिंगाणा सुळका सर केला. यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘वजीर’ही सर केला.
ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी वजीर सुळका आहे. ९० अंशातील ३०० फूट उंच भला मोठा हा सुळका चढाईसाठी अत्यंत अवघड मानला जातो. अंगाला दरदरून घाम फोडणारा हा सुळका सर करण्याचे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. रोहित व त्याच्या सहकाऱ्यांनी कदबाव या गावापासून मोहिमेला सकाळी सहा वाजता सुरुवात केली.
डोंगरावरील खडतर आव्हाने पेलत हे गिर्यारोहक दोन तासांनंतर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. यानंतर सुळका सर करण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर उभे ठाकले. मात्र, रोहित व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी ‘वजीर’ सर करण्याचा चंग बांधला होता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी रोपच्या साह्याने हा सुळका अखेर सर केला अन् सुळक्यावर तिरंगाही फडकविला.
या मोहिमेत स्वानंदी तुपे, सचिन तुपे, करिश्मा राणा, प्रियांका चव्हाण, स्नेहा सुरवसे, डॉ. मनीषा सोनावणे, आरती शिंदे यांनीही सहभाग घेतला. त्यांना अनिल वाघ, महेश पवार, संदीप आजबे, गिरीष डेंगाने व शिवसह्याद्री ट्रेकिंग गुु्रपचे मार्गदर्शन लाभले.
- ‘बेटी बचाओ... बेटी पढाओ’चा दिला नारा
वजीर सुळका सर करताच रोहित जाधव व त्याच्या सहकारी गिर्यारोहकांनी भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन विजयाचा आनंद साजरा केला. तसेच राष्ट्रप्रेम चेतवणारे राष्ट्रगीतही म्हटले. यावेळी ‘बेटी बचाओ.. बेटी पढाओ’ असा नारा देत नारी शक्तीचा जागर ही करण्यात आला.
वडिलांमुळे माझ्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. मी आजवर महाराष्ट्रातील अनेक गड-कोट अन् सुळके सर केले आहेत. जगातील सर्वात मोठी सात शिखरं मला सर करावयाची आहेत.
- स्वानंदी तुपे, (कुंजीरवाडी, हरपडसर)
गिर्यारोहणाचं कोणतंही प्रशिक्षण नसताना मी लिंगाणा आणि त्यानंतर वजीर सुळका यशस्वी सर केला. हा सुळका सर करणं म्हणजे एखादं स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे. आजवरचा हा माझा अविस्मरणीय अनुभव असून, आता मी गिर्यारोहणाचं प्रशिक्षणही घेणार आहे. - रोहित जाधव, कुमठे (कोरेगाव)