वृद्धांपेक्षा जास्त तरुणच ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:39 AM2021-04-01T04:39:31+5:302021-04-01T04:39:31+5:30
कऱ्हाड : बालकांसह वृद्धांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र, कऱ्हाड तालुक्यात वृद्धांपेक्षा जास्त तरुणच कोरोना बाधित ...
कऱ्हाड : बालकांसह वृद्धांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र, कऱ्हाड तालुक्यात वृद्धांपेक्षा जास्त तरुणच कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. एकूण बाधितांपैकी सुमारे निम्मे रुग्ण ११ ते ४० वयोगटातील आहेत. तर साठीनंतरच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी असून बाधितांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.
कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास अशी या रोगाची साधारण लक्षणे सांगण्यात आली. मात्र, कसलीच लक्षणे नसलेल्यांचे अहवालही सर्रासपणे ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. तसेच या रोगाचा बालकांसह वृद्धांना जास्त धोका असल्याचे सुरुवातीपासून सांगण्यात येते. बालक व वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे संसर्ग तत्काळ होऊ शकतो आणि परिस्थितीही बिकट बनू शकते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, कोरोनाविषयी वर्तविले जाणारे सर्व संकेत वेळोवेळी चुकीचे ठरल्याचे दिसून येत आहे. लक्षणे नसलेल्यांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येताहेत. बालक व वृद्धांपेक्षा तरुणच मोठ्या प्रमाणावर बाधित आढळताहेत. तसेच मृतांमध्येही तरुण आणि मध्यमवयीन रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे.
आरोग्य विभागाकडून गावोगावी सर्व्हे केला जात असताना विशेषत: वृद्धांची नोंद प्रामुख्याने घेतली जाते. तसेच कोमॉर्बिड लक्षणे असलेल्यांवरही लक्ष केंद्रीत केले जाते. वृद्धांसह बालक आणि इतर आजार असणाऱ्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्यामुळे या उपाययोजना हाती घेतल्या जाताहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचे स्वरूपच बदलत असल्याने प्रतिबंध आणि उपचारांबाबतही ठोसपणा दिसत नाही.
- चौकट
‘पॉझिटिव्ह’ की ‘निगेटीव्ह’... संभ्रम कायम!
कोरोनाबाबत सुरुवातीपासूनच मोठी संभ्रमावस्था आहे. आरोग्य विभागाला कोरोनाच्या लक्षणांबाबत ठोस काहीही सांगता येत नाही. ज्यांना लक्षणे आहेत त्या सर्वांचेच अहवाल बाधित येत नाहीत. मात्र, ज्यांना कसलीच लक्षणे नाहीत, त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे अनेकवेळा दिसून येते. त्यामुळे हा रोग, त्याची लक्षणे आणि उपचारपद्धती याबाबत असलेली संभ्रमावस्था आजही कायम आहे.
- चौकट
वयानुसार बाधितांची संख्या
वय : बाधित
० ते १ : १८
१ ते १० : ३९५
११ ते ४० : ४५७१
४१ ते ६० : ३५२३
६१ ते ८० : १७९४
८० च्या पुढे : १५५
एकुण : १०४५६
- चौकट
वयानुसार स्त्री, पुरुष रुग्ण
वय : पुरूष : महिला
० ते १ : १२ : ६
१ ते १० : १९६ : १९९
११ ते ४० : २५८० : १९९१
४१ ते ६० : २१२४ : १३९९
६१ ते ८० : ११०४ : ६९०
८० च्या पुढे : १०७ : ४८
एकुण : ६१२३ : ४३३३
- चौकट
बाधित प्रमाण
पुरुष : ५८.५६ टक्के
महिला : ४१.४४ टक्के
- चौकट
सरासरी
बालक : ०.१७ टक्के
किशोरवयीन : ३.७८ टक्के
तरुण व प्रौढ : ४३.७२ टक्के
ज्येष्ठ : ३३.६९ टक्के
वृद्ध : १८.६४ टक्के
- चौकट
कऱ्हाड तालुक्यात आजअखेर एकूण ८८ गर्भवतींना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी २ गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे.