तुमचा फ्रीज ‘पॉझिटिव्ह’ नाही ना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:57+5:302021-08-23T04:41:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘तुमचा फ्रीज पॉझिटिव्ह तर नाही ना’ हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘तुमचा फ्रीज पॉझिटिव्ह तर नाही ना’ हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे अगदी खरं आहे. फ्रीजखाली असलेल्या पाण्याच्या ट्रेमध्ये डेंग्यू अळ्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे हिवताप विभागाच्या निदर्शनास आले आहे. सातारा जिल्ह्यात फ्रीज ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे प्रमाण तब्बल ५२ टक्के असून, डेंग्यूचे उगमस्थान घरातच असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार डोके वर काढतात. सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असे रुग्ण सातत्याने आढळून येऊ लागले आहेत. डेंग्यूच्या अळ्या प्रामुख्याने घाणीच्या ठिकाणी वाढतात, असा अनेकांचा समज आहे मात्र तो चुकीचा आहे. घर स्वच्छ असले तरी घरातील फ्रीज, वातानुकूलित यंत्र हेच डेंग्यूच्या उत्पत्तीचे उगमस्थान आहे.
फ्रीजच्या मागे पाणी साठविण्याचा ट्रे असतो. या ट्रेमध्ये सातत्याने पाणी साचत असते. आपण फार कमीवेळा हा ट्रे स्वच्छ करतो. हिवताप विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात जास्त डेंग्यूच्या अळ्या या फ्रीजच्या ट्रे मध्येच आढळून आल्या आहेत व आजही आढळून येत आहेत. ज्या फ्रीजमध्ये अशा अळ्या आढळतात, तो फ्रीज हिवताप विभागाच्या भाषेत ‘पॉझिटिव्ह’ म्हणून ओळखला जातो. सातारा शहरात घरोघरी फ्रीज, एसी, कुलर अशा वस्तू आहेत. अनेक नागरिक या वस्तूंच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार दिवसेंदिवस बळावू लागले आहेत.
(चौकट)
सर्व्हे काय सांगतो
- हिवताप विभागाकडून गृहभेटीद्वारे डेंग्यू अळ्यांचा शोध घेण्यात आला.
- या सर्वेक्षणात पाण्याचे पिंप, रांजण, टाक्या, फ्रीज, कुलर, भंगार साहित्य अशा वस्तूंची पाहणी केली.
- पाण्याच्या पिंपामध्ये डेंग्यू अळ्या हमखास सापडल्या.
- मात्र फ्रीजमध्ये या अळ्या सापडण्याचे प्रमाण अधिक आहे.
- १०० फ्रीज तपासल्यानंतर ५० ते ५५ फ्रीजमध्ये डेंग्यू अळ्या आढळल्या.
(चौकट)
अशा ओळखा अळ्या
डेंग्यूच्या चार अवस्था असतात. पहिल्यांना मादी अंडी टाकते. त्यानंतर त्याचे अळीत रुपांतर होते. तिसऱ्या अवस्थेत कोष तयार होतो तर चौथ्या अवस्थेत डासाची वाढ होऊन तो हवेत उडण्यास म्हणजेच चावा घेण्यास तयार होतो. चार अवस्था पूर्ण होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागतो. पाण्याचा ट्रे असो किंवा टाकी त्याची आठवड्यातून एक दिवस पाहणी करणे गरजेचे आहे. बॅटरीने पाहिल्यास आपल्याला पाण्यात सूक्ष्म अळ्या नजरेस पडू शकतात. या अळ्या तातडीने नष्ट कराव्या. साचलेले पाणी कोरड्या जागेत ओतून द्यावे.
(चौकट)
ही काळजी घ्या
एडिस डासांमुळे डेंग्यू हा आजार होतो. हे डास ओलसर जागेत अधिक वाढतात. त्यामुळे घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. घरातील भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, टायर यांची विल्हेवाट लावावी. दैनंदिन पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. पावसाळ्यात शक्यतो फ्रीज बंद ठेवावा. त्याचा वापर होत असल्यास आठवड्यात एकदा घासून, पुसून कोरडा करावा.
(चौकट)
डेंग्यू अळ्या सापडण्याचे प्रमाण
फ्रीज ५२ %
बॅरल २७ %
टाकाऊ वस्तू १४ %
कुंड्या ७ %