आपल्यातील परकी अन् परक्यांतील आपल्यांची पारख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:40 AM2021-01-25T04:40:20+5:302021-01-25T04:40:20+5:30

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन ...

Your judgment of strangers and of strangers | आपल्यातील परकी अन् परक्यांतील आपल्यांची पारख

आपल्यातील परकी अन् परक्यांतील आपल्यांची पारख

Next

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन हजारांत फितूर झालेल्यांचा बुरखा यानिमित्ताने उतरला आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले, तर काहींनी आपला गड कायम राखला.

काही ठिकाणी युवकांना संधी दिली गेली, तर काही ठिकाणी ज्येष्ठांचाच मान राखल्याचे निकालातून स्पष्ट झाले. आपल्या लोकांच्या विश्वासावर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटलेल्या अनेक तरुण उमेदवारांना आपल्याच लोकांनी केलेल्या दगा, फटक्यांमुळे पराभवाचा सामना करावा लागला. ग्रामविकासाचे ध्येय उराशी बाळगलेल्या उमेदवारांचा धनशक्ती अन् फितुरांच्या सहकार्याने विरोधकांनी केलेला पराभव हा लोकशाहीचा पराभव असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

नेहमी आपल्या आजूबाजूला वावरणारी आणि डोळ्यांसमोर दिसणारी माणसं आपली आहेत, असा भाबडा आशावाद अनेकांना असतो. ही माझी माणसं आहेत असं तो विश्वासानं इतरांना सांगत असतो. अडचणीच्या काळात आपल्याला दादा.. दादा.. म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि व्याकूळतेने आवाज देणाऱ्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न अनेकांकडून नेहमी केला जातो. गावाच्या सर्वांगीण विकासाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहू, असा शब्द जवळचे लोक निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देतात. मात्र, मतदानाच्या अगोदर विराेधकांनी आवडीच्या पेयाबरोबर एक-दोन वेळचे जेवण आणि हजार-दोन हजार रुपयांच्या नोटा खिशात कोंबल्यानंतर लगेच मतपरिवर्तन झाल्याचे दिसून येते. योग्य-अयोग्याचं देणं-घेणं नसलेली ही मंडळी लगेच परक्यांच्या झुंडीत सहभागी होतात. विरोधकांनी डोक्यात भरलेलं चुकीचं ज्ञान त्यांना ब्रह्मज्ञान वाटू लागतं आणि आपल्याच जवळच्या उमेदवाराच्या पराभवाचे नियोजन करू लागतात. प्रचारादरम्यान आणि निवडणुकीनंतर उमेदवाराच्या नजरेला नजर न भिडविणे या कृतीमुळेच चुकीच्या पद्धतीनं वागलो हे संबंधिताला जाणवलं असल्याचं स्पष्ट होतं.

चौकट

दगाफटक्याची सल कायम

ग्रामपंचायत निवडणुका दर पाच वर्षांनी होतातच; परंतु आपल्यांनी केलेला दगाफटका मनामध्ये मात्र कायम घर करून राहतो. त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्यातील परके आणि परक्यांतील आपलं कोण हे ओळखायचे असेल, त्यानं निश्चितपणे एकदा तरी ग्रामपंचायत निवडणूक लढवायला हवी, अशीच चर्चा गावोगावच्या पारावर सुरू आहे.

Web Title: Your judgment of strangers and of strangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.