आपल्या वाहनावर दंड तर नाही ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:55+5:302021-09-27T04:42:55+5:30
सातारा : अनेक वाहन चालकांना आपल्या वाहनावर दंड आहे की नाही हे महिनोन्महिने समजत नाही. मोबाइलवरील मेसेज न आल्यामुळे ...
सातारा : अनेक वाहन चालकांना आपल्या वाहनावर दंड आहे की नाही हे महिनोन्महिने समजत नाही. मोबाइलवरील मेसेज न आल्यामुळे वाहनचालक गाफील राहतात. जेव्हा कधी घराच्या पत्त्यावर चालान भरण्याची नोटीस येते तेव्हाच वाहनचालक जागे होतात. मात्र, महाट्राफिक ॲपवर आपण आपल्या वाहनावर दंड तर नाही ना, हे पाहिले तर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.
अनेकदा वाहनचालकांचे मोबाइल नंबर बदलल्यानंतर त्यांना मेसेज येणे बंद होते. रजिस्ट्रेशन करतानाचा नंबर वेगळा असतो. त्यानंबरवरच या चालानचे मेसेज येत असतात. काही वाहन चालकांना मेसेज आले तरी दंड भरण्यास वाहन चालक चालढकल करतात. जिल्ह्यात तब्बल दहा हजार जणांनी दंड थकीत ठेवला असून, या सर्वांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. काही जण लोकअदालतीमध्ये तडजोडी करून दंड भरत आहेत. मात्र, ज्यांनी दंड भरला नाही त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस सरसावले आहेत.
चौकट : वाहनावर दंड आहे का या ॲपवर शोधा...
आपल्या वाहनावर दंड आहे का हे शोधण्यासाठी महाट्राफिक ॲप आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करा. या ॲपमध्ये दंड किती आहे, हे समजलेच. तुम्हाला मोबाइलवरच चलन भरण्याचीही सुविधा आहे. त्यामुळे चालढकल न करता आपल्या वाहनावर असलेला दंड वेळीच भरून आपण तणावमुक्त राहावे; अन्यथा दंडाची रक्कम दिवसेंदिवस वाढतच जाईल. ज्यावेळी तुमची गाडी पुन्हा पकडली जाईल, तेव्हा तुम्हाला पाठीमागचा थकीत दंडही भरावा लागतो.
कोट:
ज्यांनी दंड भरला नाही त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. अनेक जण तडजोड करून दंड भरत आहेत. आपल्या वाहनावर दंड किती आहे, हे शोधण्यासाठी प्रत्येकाने हे महाट्राफिक ॲप डाऊनलोड करावे. थकीत रक्कम जास्त झाली, तर तुम्हाला रक्कम भरताना नाकीनऊ येईल. परिणामी, पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
-विठ्ठल शेलार, सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, सातारा