कारखान्याचे काळे पाणी बंद करण्यासाठी युवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 07:05 PM2020-01-27T19:05:51+5:302020-01-27T20:26:40+5:30
ग्रामसभेत साखर कारखान्यामधून येणारे काळे पाणी गोपूज हद्दीत सोडण्यात येऊ नये, यामुळे विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्त्रोत खराब होऊ लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, काळे पाणी व मळीचा प्लांट बंद करण्यात यावा, याबाबत ठराव करण्यात आला होता, तसा पत्रव्यवहार कारखान्याशी करण्यात आला
औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स या साखर कारखान्यातून येणारे टाकाऊ काळे पाणी बंद करण्यासाठी रविवारी झालेल्या ग्रामसभेत एकमुखाने ठराव संमत करण्यात आला.
सरपंच उषा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवक सुनील राजगुरू यांनी विविध विषयांचे वाचन केले. कारखान्यातून येणारे काळे पाणी यासंदर्भात याअगोदर दि. १९ रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यावेळी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असलेले युवक, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामसभेत साखर कारखान्यामधून येणारे काळे पाणी गोपूज हद्दीत सोडण्यात येऊ नये, यामुळे विहिरी, कूपनलिका व अन्य जलस्त्रोत खराब होऊ लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. आरोग्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, काळे पाणी व मळीचा प्लांट बंद करण्यात यावा, याबाबत ठराव करण्यात आला होता, तसा पत्रव्यवहार कारखान्याशी करण्यात आला होता.
रविवार, दि. २६ रोजी झालेल्या ग्रामसभेत कारखान्याने दिलेल्या लेखी उत्तराचे वाचन करण्यात आले. यामध्ये कारखान्याने पुढील हंगामात मळी प्लांट बंद करणार असून, आताचा गाळप हंगाम पूर्ण झाल्यानंतर गावाला दिलेल्या पाणीपुरवठा योजनेस फिल्टर बसवून देण्याचे लेखी दिले आहे. काळे पाणी लगेचच बंद झाले पाहिजे, ते गावच्या हद्दीत न सोडता कारखान्याने त्याचे व्यवस्थापन स्वतंत्ररीत्या करावे, या मागणीवर युवक व ग्रामस्थ ठाम आहेत. यावेळी उपसरपंच, सदस्य, युवक, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्यातून निघणारे काळे पाणी प्रथमत: बंद करावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. कारखान्याला आमचा विरोध नाही. इटीपी पंप लवकरात लवकर बसवावा, त्यामुळे प्रदूषण होणार नाही. मात्र काळ्या पाण्याचा बंदोबस्त कारखाना प्रशासनाने तातडीने करावा, गावच्या हद्दीत हे पाणी सोडू नये.
-जयदीप देशमुख, गोपूज
पाण्याचा पुनर्वापर होण्यासाठी कंडेन्सट पॉलिशिंग युनिट नावाची यंत्रणा बसविण्यासाठी २०१७ मध्ये व्यवस्थापनाने निर्णय घेतला होता. गळीत हंगामात काही शेतकऱ्यांनी याच पाण्याची शेतीसाठी मागणी होती. ते पाणी आम्ही दिले, त्यामुळे कंडेन्सट पॉलिशिंग युनिटचे काम प्रलंबित पडले. आता ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून इटीपीचे पाणी इतरत्र कुठेही सोडणार नाही.
-स्वरूप देशमुख, असि. जनरल मॅनेजर, ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपूज.