महिला पोलिसाशी अश्लील संभाषणप्रकरणी युवकास अटक
By admin | Published: February 9, 2015 10:09 PM2015-02-09T22:09:22+5:302015-02-10T00:06:22+5:30
‘डायल १००’वर घडला प्रकार : मोबाईल क्रमांकावरून पोलिसांची कारवाई
सातारा : पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात ड्युटीवर असणाऱ्या एका महिला पोलिसाशी ‘डायल १००’ वरून अश्लील संभाषण करणाऱ्या एका युवकास सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ज्या मोबाईलवरून ‘डायल १००’वर कॉल आला होता, तो क्रमांक पोलिसांना मिळाल्यानंतर संबंधित युवकाला अटक करण्यात आली. निखिल मोरेश्वर यादव असे या युवकाचे नाव आहे. सातारा पोलीस मुख्यालायतच नियंत्रण कक्ष असून, येथून जिल्हा पोलीस ठाण्यातील घटना त्याचबरोबर इतर माहितीचे संकलन केले जाते. येथे ‘डायल १००’वर दररोज शेकडो कॉल येतात. यापैकी अनेक कॉल ‘फेक’ असतात. परिणामी हे कॉल घेण्यातच नियंत्रण कक्षातील अनेकांचा वेळ जातो. कोणत्याही कॉईनबॉक्स अथवा मोबाईलवरून ‘डायल १००’वर कॉल सुविधा मोफत असल्यामुळे लहान मुले अनेकदा त्याचा गैरफायदा घेतात आणि ‘डायल १००’वर कॉल करून पोलिसांना त्रास देतात. त्याचा फटकाही पोलिसांना अनेकदा बसला आहे. रविवारी याचा फटका चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्यालाच बसला.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार, दि. ८ रोजी सकाळी संबंधित महिला पोलीस कर्मचारी सेवा बजावत असताना एका युवकाचा मोबाईलवरून ‘डायल १००’वर कॉल आला. यावेळी त्याने अश्लील संभाषण केले. दरम्यान, संबंधित महिला कर्मचाऱ्याने अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ज्या मोबाईवरून कॉल आला, तो क्रमांक पोलिसांना मिळविला आणि ज्या कोणी कॉल केला होता त्याचा शोध घेतला.
दरम्यान, हा कॉल निखिल मोरेश्वर यादव (वय २४, रा. सोळशी, ता. कोरेगाव) याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला दुपारी दोन वाजता अटक केली. (प्रतिनिधी)