मंदिराजवळ तरुणाची आत्महत्या
By Admin | Published: June 30, 2016 10:05 PM2016-06-30T22:05:53+5:302016-06-30T23:57:15+5:30
आजाराला कंटाळल्याची चिठ्ठी : विषारी औषध प्राशन करून चाकूने भोसकून घेतले
सातारा : मर्ढे (ता. सातारा) येथील जगेश महिपती शिंगटे (वय २५) याने भर्गोराम मंदिरालगत विष पिऊन व चाकूने स्वत:वर वार करून आत्महत्या केली. ‘आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे,’ अशी चिठ्ठीही त्याच्या खिशात सापडली आहे.
विरमाडे (ता. वाई) येथील भर्गोराम मंदिरालगत असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामी समाधीजवळ हा प्रकार उघडकीस आला. जगेश बुधवारी मध्यरात्री दुचाकीवरून या मंदिराजवळ आला. शेतीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध पिल्यानंतर त्याने स्वत:च्या दोन्ही हातांच्या शिरा कापून घेतल्या. तसेच छातीवर चाकूने तीन वारही करून घेतले. त्याचा मृतदेह पाहून ही हत्या की आत्महत्या, असे संशयास्पद वातावरण तेथे निर्माण झाले होते. मात्र, जगेश याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
‘आपण आपल्या शारीरिक व मानसिक आजाराला कंटाळून आत्महत्या करत असून,
माझ्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये. माझ्या आजारपणास आतापर्यंत भरपूर खर्च झाला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे,’ असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.
सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना प्रथम त्याचा मृतदेह दिसला. त्यांनी त्याबाबतची माहिती भुर्इंज पोलिसांना कळविली. पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)