अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍यावरून उडी मारून युवकाची आत्महत्या

By दत्ता यादव | Published: October 2, 2023 10:01 PM2023-10-02T22:01:49+5:302023-10-02T22:03:16+5:30

मृत सांगलीचा; वसतिगृहातून रविवारी अचानक गायब

youth ends life by jumping from ajinkyatara fort | अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍यावरून उडी मारून युवकाची आत्महत्या

अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍यावरून उडी मारून युवकाची आत्महत्या

googlenewsNext

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : कऱ्हाड येथे एका महाविद्यालयात शिकत असलेल्‍या युवकाने अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मृत युवक सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी या गावातील राहणारा आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.

श्रीराज मानसिंग पाटील (वय १७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, श्रीराज पाटील हा कऱ्हाड येथील एका कॉलेजमध्ये बी.फार्मसीचे शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी तो वसतिगृहातून अचानक गायब झाला. रात्री  उशिरापर्यंत  तो  वसतिगृहात परत न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरी फोन करून तो घरी आला आहे का, याची विचारणा केली. 

परंतु तो गावी आला नसल्याने कुटुंबीय तातडीने कऱ्हाड येथे आले. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात रात्री अकरा वाजता कुटुंबीयांनी त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद नोंदवली. त्यानंतर कऱ्हाड पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्या मोबाइलवर त्यांनी फोन केला असता तो फोन उचलत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता अजिंक्यतारा किल्ला दाखवले. त्यानुसार रात्रीच पोलिस अजिंक्यतारा किल्ला परिसरात आले. मात्र, तो सापडला नाही. दरम्यान, साेमवारी सकाळी पुन्हा अजिंक्यताऱ्यावर शोध सुरू केला असता श्रीराजचा मृतदेह दरीत आढळून आला. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या पथकाने दरीत उतरून त्याचा मृतदेह दरीतून वर काढला. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

Web Title: youth ends life by jumping from ajinkyatara fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.