मुलीवर अत्याचारप्रकरणी युवकाला सात वर्षे शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 09:08 PM2019-01-16T21:08:57+5:302019-01-16T21:10:12+5:30
शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सदाशिव बसाप्पा ढाले (वय ३२, रा. हडगलीतांडा, ता. विजापूर) याला पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. जे. खान यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सातारा : शहरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सदाशिव बसाप्पा ढाले (वय ३२, रा. हडगलीतांडा, ता. विजापूर) याला पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. जे. खान यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, सातारा शहरातील एका व्यावसायिकाकडे सदाशिव ढाले हा जेसीबी चालक म्हणून काम करत होता.
संबंधित व्यावसायिकाच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी १४ एप्रिल २०१७ रोजी खासगी क्लासला गेली होती. त्यावेळी ढाले हा तिच्या क्लासवर गेला. ‘तू माझ्यासोबत आली नाहीस, तर मी आत्महत्या करेन. तसेच तुझ्या आई-वडिलांची बदनामी करेन,’ अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर त्या मुलीला त्याच्या हडगलीतांडा, ता. विजापूर या गावी जबरदस्तीने घेऊन गेला. त्याच दिवशी रात्री त्याने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यावेळी जेसीबीचा चालकही गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सातारा शहर पोलिसांचे एक पथक विजापूरला रवाना झाले. हे पथक आणि विजापूरच्या पोलिसांनी हडगलीतांडा येथून दि. १६ एप्रिल २०१७ रोजी रात्री एक वाजता मुलीला व ढालेला ताब्यात घेतले. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाललैंगिक अत्याचार कलमातर्गंत सदाशिव ढालेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जाधव यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्रा' मानून न्यायालयाने सदाशिव ढाले याला सात वर्षे सक्तमजुरी तसेच २ हजार रुपये दंड व दंड न दिल्यास साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. उर्मिला फडतरे, अॅड. मंजूषा तळवळकर यांनी काम पहिले.
सदाशिव ढाले
सातारा येथे बुधवारी न्यायालयाने आरोपी सदाशिव ढाले याला अत्याचार प्रकरणात शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याला पोलिसांनी कारागृहात नेले.