भाविक चिमुरड्यासह युवक ठार

By admin | Published: September 11, 2016 11:54 PM2016-09-11T23:54:00+5:302016-09-11T23:54:00+5:30

पोलिसांत नोंद : पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील विविध घटना

Youth killed with devotees Chimudra | भाविक चिमुरड्यासह युवक ठार

भाविक चिमुरड्यासह युवक ठार

Next

पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर विविध अपघांतात एका चिमुरड्यासह युवक ठार झाला आहे. टेम्पोने दिलेल्या धडकेत पुणे जिल्ह्यातील भाविकांमधील एका साडेचार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत भिलारमधील युवक कारच्या अपघातात ठार झाला आहे.
याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शंकर रामभाऊ चव्हाण (वय ६२, रा. वडज, ता. जुन्नर, जि. पुणे) हे पत्नी सुमित्रा, मुलगा अमोल, सून सुरेखा, नातू प्रयाग, नात स्वरा असे सहाजण वडज येथीलच रूपाली नीलेश दिवेकर यांच्या ट्रॅव्हल्स (एमएच ०४ जी ५९०५ ) मधून अष्टविनायक दर्शनासाठी आले होते. ओझर, पाली, लेण्याद्री, महड असा प्रवास करीत ते महाबळेश्वरकडे शनिवारी रात्री आले होते. महाबळेश्वर दर्शन करून या गाडीतील सर्व भाविक गुरेघर येथील बसस्थानकाच्या शेजारील एका हॉटेलमध्ये निवासाला उतरले होते.
रविवारी सकाळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी गुरेघर बसस्थानकात जमा झाले होते. शंकर चव्हाण हे आपला नातू प्रयाग याला घेऊन बसस्थानकाच्या समोर रस्त्याच्या पलीकडील बाजूस गेले होते. परंतु प्रयागला आजी समोर दिसल्याने तो धावत तिकडे पळत होता. प्रयाग रस्त्याच्या मधोमध येताच महाबळेश्वरकडून येणाऱ्या टेम्पो (एमएच ११ एजी २१५८ ) ने डाव्या बाजूने प्रयागला जोराची धडक दिली. प्रयाग गाडी खाली आल्याने त्याच्या डोके व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. प्रयागला तातडीने उपचारासाठी बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु प्रयाग याचा मृत्यू झाला. ऐन गणपतीतच अष्टविनायक दर्शनासाठी आलेल्या या भाविकांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
टेम्पो चालक लक्ष्मण जानू शिंदे (वय ४८, रा. देवळी मुरा-झोळाची खिंड, ता. महाबळेश्वर) याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरी घटनाही महाबळेश्वर-पाचगणी मुख्य मार्गावर तायघाट गावाजवळ घडली. कारचा अपघात होऊन भिलार येथील एक युवक जागीच ठार झाल्याची ही घटना शनिवारी रात्री घडली. नीलेश रामचंद्र भिलारे (वय २६, रा. भिलार) हा युवक कार (एमएच ११ बीएच ५५९९) चालवीत भिलारहून पाचगणीकडे जात होता. रात्री साडेबाराच्या सुमारास तायघाट गावच्या हद्दीत भुंडा बंगल्याजवळ त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या इलेक्ट्रीक पोलवर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, इलेक्ट्रीक पोल पूर्णपणे रस्त्यावर कोसळला. परंतु गाडी वेगाने १०० फूट पुढे जाऊन पलटी झाली. धडकेत कारचे टायर फुटून बाजूला गेले होते. या अपघातात नीलेश गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती एका पर्यटक गाडीतील लोकांनी पाचगणी येथे बाजारात उभ्या असणाऱ्या प्रतीक हेमंत देसाई (वय २६) याला दिली. प्रतीकने लागलीच आपल्या मित्रांसह अपघाताचे ठिकाण गाठले व नीलेशला गाडीतून बाहेर काढले. वाईतील रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (वार्ताहर)

 

Web Title: Youth killed with devotees Chimudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.