तरुणांनी राजकारणात सक्रिय राहावे
By admin | Published: June 21, 2015 09:49 PM2015-06-21T21:49:03+5:302015-06-22T00:24:10+5:30
रामराजे नाईक-निंबाळकर : फलटण येथे राष्ट्रवादी युवकचा मेळावा
फलटण : ‘तालुक्यातील तरुणांच्या मनाचा वेध घेऊन राजकीय सत्तेच्या माध्यमातून गेली २२ वर्षे कृषी, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रांत विकासाचे पर्व निर्माण करण्यात यश मिळाले. तालुक्याचा विकास गतिमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे तरुणांनी विकासकामाची जबाबदारी घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. तालुक्याच्या विकासाची परंपरा अखंडित राहण्यासाठी तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभागी व्हावे,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
फलटण तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवक मेळावा आणि विधानपरिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील होते. यावेळी आ. दीपक चव्हाण, माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, बाळासाहेब सोळसकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती सभापती स्मिता सांगळे, नगराध्यक्षा सारिका जाधव, श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष अॅड. नितीन भोसले, सुभाषराव शिंदे, महादेव पवार, डी. के. पवार आदी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘तालुक्यातील तरुणांच्या विविध प्रश्नांच्या भावनेतून आपल्या राजकीय विचारांचा जन्म झाला. त्या विचारांना पहिल्यापासूनच युवकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला, त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभेपर्यंतच्या राजकीय सत्तेच्या संधी मिळाल्या. संघर्षातून राजकीय सत्तास्थाने मिळवून देण्यात युवाशक्तीचे योगदान होते. शरद पवार यांच्यासारख्यांची साथ मिळाली. त्यातूनच तालुक्यात विकासाची घोडदौड सुरू ठेवली.’
सुप्रिया सस्ते, प्रशांत निंभोरे, पराग भोईटे, किशोरसिंह निंबाळकर, अमोल भोईटे, भाऊसो सोनवलकर, राजेंद्र पवार आदींनी समस्या मांडल्या.
कार्यक्रमाला युवक उपस्थित होते. जयकुमार इंगळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. राजश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
रामराजेंनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या...
‘राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या बाहेर असूनही विधान परिषदेच्या माध्यमातून फलटणला लालदिवा मिळाला, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. शरद पवार यांनी रामराजेंवर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या, त्या त्यांनी यशस्वी करून दाखविल्या असे उमेश पाटील यांनी सांगितले.’