युवा पिढीने ग्रंथवाचनावर भर द्यावा: श्वेता सिंघल, सातारा ग्रंथोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 07:50 PM2017-11-18T19:50:44+5:302017-11-18T19:55:10+5:30
सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो,
सातारा : ‘ग्रंथामुळे जीवनाला नवी दिशा मिळते, विचारांची देवाण-घेवाण होते, ग्रंथ हे विचार करायला शिकवते, प्रेरणा देतात व जगण्याचे बळ देतात या ग्रंथातूनच एक चांगला माणूस घडतो, त्यामुळे युवा पिढीने जास्तीत जास्त ग्रंथ वाचावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील अजिंक्य कॉलनी मैदानावर दि.१८ व १९ नाव्हेंबर या कालावधीत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.याचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या उद्घाटनप्रसंगी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, प्रा. श्रीधर साळुंखे, कवी प्रदीप कांबळे, नगरसेविका सविता फाळके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंघल म्हणाल्या, ‘वाचनामुळे अनेक गोष्टी आपल्याला समजायला मदत होते. मनुष्याचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक होय. आपली एका पुस्तकाशी मैत्री झाली तर त्याद्वारे आपणांस अनेक पुस्तकरुपी मित्र भेटतात. आपल्या आयुष्यात ग्रंथांचे, पुस्तकांचे खूप महत्त्व आहे. वाचन ही एक अशी गोष्ट आहे की, त्यामुळे आपल्या ज्ञानात सतत भरच पडत असते. एखादे प्रेरणादायी पुस्तक परत-परत वाचताना सतत आपल्याला नवा अनुभव येऊ शकतो. ज्ञानामुळेच आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. यासाठी आपण स्वत:ला सतत अद्ययावत ठेवले पाहिजे. ग्रंथ ही आयुष्यातील सर्वात अमूल्य ठेव असते.
ग्रंथांचे महत्त्व शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येक कुटुंबाने एकतरी ग्रंथ विकत घेऊन तो आपल्या घरात युवकांना वाचनास द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ग्रंथ हे प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून श्रीधर साळुंखे म्हणाले, ग्रंथवाचनाने खरे जीवन जगता येते. ग्रंथाच्या सानिध्यात राहिलेला माणूस हा समाजातील चांगला माणूस म्हणून पुढे येतो. ग्रंथ वाचनाची संस्कृती वाढली पाहिजे. यामुळे चांगला समाज निर्माण होईल. ग्रंथ वाचनामुळे आत्म्याचे शुद्धीकरण होते. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम ग्रंथ करतात. ग्रंथ हे आपले खरे मित्र असून, ग्रंथ प्रत्येकाने वाचले पाहिजेत. जिल्'ात ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढली पाहिजे.’
या कार्यक्रमाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. दीपक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नंदा जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास ग्रंथालय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल शेजारी संभाजीराव पाटणे, डॉ. राजेंद्र माने, अमित सोनावणे, सविता फाळके, श्रीधर साळुंखे.