भावंडांसाठी युवक बुडाला
By admin | Published: February 22, 2017 10:56 PM2017-02-22T22:56:43+5:302017-02-22T22:56:43+5:30
मेणवलीत दोघांना वाचविताना मृत्यू : दोघांची प्रकृती गंभीर
वाई : वाई तालुक्यातील मेणवली येथे डोहात बुडणाऱ्या दोघा भावंडांना वाचविण्याच्या प्रयत्नात पाचगणीतील युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. रोहन रतन मोरे (वय ३२, रा. गोडवली-पाचगणी, ता. महाबळेश्वर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. संबंधित दोघा युवकांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन मोरे हा छोटा भाऊ रोहित, बहीण, मावशी व खारघर (मुंबई) येथील नातेवाइकांसह बुधवारी दुपारी मेणवली येथे फिरण्यासाठी आला होता. अडीच वाजण्याच्या सुमारास रोहनच्या मावशीचा मुलगा सोनू व छोटा भाऊ रोहित हे दोघेजण घाटावर असलेल्या डोहात पाय सोडून बसले होते. काही वेळानंतर दोघेही पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने सोनू व रोहित दोघेही पाण्यात बुडू लागले.
यावेळी दोघांनी आरडाओरड केल्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहन मोरे याला पोहता येत असल्याने त्याने डोहात उडी मारून दोघा भावांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दम लागल्याने तोही पाण्यात बुडू लागला. नातेवाइकांचा आक्रोश ऐकताच स्थानिक ग्र्रामस्थ घटनास्थळी आले. यामधील खुदबुद्दीन आतनूर, सैफान मुल्ला व विशाल मोरे (रा़ मेणवली) यांनी सोनू व रोहित या दोघांना तातडीने पाण्याबाहेर काढले. यानंतर रोहनला पाण्याबाहेर काढण्यात आले.
ग्रामस्थांनी तिघांना वाई ग्रामीण रुग्णालयात हलविले. याठिकाणी डॉक्टरांनी रोहन मोरे याला मृत घोषित केले. दरम्यान, सोनू व रोहित या दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद राजेश कदम (रा. मालतपूर, ता. वाई) यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)