गुऱ्हाळातील चरख्याच्या पट्ट्यात अडकून युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:42+5:302021-01-02T04:55:42+5:30
केरमसिंह सोहबत मेहडा (वय १८, रा. बायडीपुरा छटवाणी, ता. कुकशी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. कोणेगाव) असे ठार ...
केरमसिंह सोहबत मेहडा (वय १८, रा. बायडीपुरा छटवाणी, ता. कुकशी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश, सध्या रा. कोणेगाव) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, याबाबत मृत केरमसिंहचे वडील सोहबत विनजिया मेहडा यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिलेल्या फिर्यादीनुसार, मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुकादम जालमसिंह रकसिंह मेहडा (रा. मध्य प्रदेश, सध्या रा. कोणेगाव) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणेगाव गावच्या हद्दीत राजेंद्र कृष्णत चव्हाण यांच्या शेतात विजय सुरेश जगदाळे यांच्या मालकीचे उसाचे गुऱ्हाळ आहे. त्यांनी ते गुऱ्हाळ करार करून जालमसिंह रकसिंह मेहडा याला चालविण्यास दिले आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास केरमसिंह हा त्याठिकाणी काम करीत असताना गुऱ्हाळाच्या चरख्याच्या पट्ट्यात अडकला. ही घटना निदर्शनास येताच इतर मजुरांनी चरखा बंद केला. मात्र, तोपर्यंत केरमसिंह गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
संबंधित गुऱ्हाळावर रस काढण्याची सर्व यंत्रणा पूर्णत: उघड्यावर असून सुरक्षिततेच्यादृष्टीने त्याठिकाणी काहीही उपाययोजना केली नसल्याने ही घटना घडली असल्याची फिर्याद मृत केरमसिंहचे वडील सोहबत मेहडा यांनी मसूर पोलिसात दिली आहे. त्यानुसार मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुकादम जालमसिंह मेहडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस फौजदार गणेश भोसले तपास करीत आहेत.