पोलीस ठाण्यातच युवकाचा कोयत्याने सपासप वार करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 04:54 PM2020-06-04T16:54:28+5:302020-06-04T16:56:08+5:30
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पोलीस ठाण्यातच कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता सातार्यात घडली.
सातारा: पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा पोलीस ठाण्यातच कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता सातार्यात घडली.
सुरेश कांबळे वय 35 राहणार सैदापूर तालुका सातारा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून रामा तुकाराम दुबळे राहणार सैदापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी सुरेश कांबळे आणि रामा दुबळे यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादातून रामा दुबळे याने सुरेश कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीसाठी सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावले होते. सुरुवातीला रामा दुबळे हा पोलीस ठाण्यात आला होता. मात्र सुरेश कांबळे हा पाठीमागून येणार होता. त्यामुळे तो त्याची वाट पाहत पोलिस ठाण्यासमोर उभा होता.
दोघेही पोलीस ठाण्यात आल्यानंतर समोरासमोर घेऊन पोलीस दोघांमध्ये तोडगा काढणार होते. दरम्यान, रामा दुबळे हा सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर उभा राहिला होता. यावेळी सुरेश कांबळे हा अचानक तेथे आला. त्याने स्वतः जवळ असलेल्या कोयत्याने रामा दुबळेवर वार केला. त्याच वेळी सुरेशच्या हातातून कोयता खाली पडला.
हाच कोयता रामा दुबळेने हातात घेतला. त्यावेळी सुरेश कांबळे हा पोलीस ठाण्यात पळत सुटला. त्याच्या पाठोपाठ रामा गेला. त्याने पोलिस ठाण्यात सुरेशच्या पोटावर वार केला. त्यानंतर सुरेश जखमी अवस्थेत पोलीस ठाण्याच्या दारात आला. तेथेही ही रामा दुबळेने सुरेश कांबळेच्या डोक्यात गंभीर वार केले.
या झटापटीत दोन पोलिसही जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यात आणि पोलीस ठाण्यासमोर रक्ताचा सडा पडला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात तत्काळ दाखल केले मात्र उपचारादरम्यान सुरेश कांबळे यांचा मृत्यू झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस ठाण्यातच खून झाल्याने जिल्हा पोलिस दल अक्षरशा हादरून गेले पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. या खुनाची माहिती सैदापूर मध्ये पोचल्यानंतर मोठ्या संख्येने जमा व सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर आला होता त्यामुळे पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.