परीक्षा संपवून पोहण्यासाठी गेलेला युवक नीरा नदीपात्रात बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 07:18 PM2018-05-26T19:18:08+5:302018-05-26T19:18:08+5:30
शिरवळ गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली
शिरवळ : शिरवळ गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. विवेक व्यंकटरमन मलमपेट्टी (वय १७, रा. शिर्के कॉलनी, शिरवळ) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने अडीच तासांनंतर त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथे राहणारा विवेक हा पुणे येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. शनिवारी त्याचा शेवटचा पेपर होता. परीक्षा देऊन तो शिरवळला आपल्या घरी आला. घरी जेवण केल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत पोहण्यासाठी नीरा नदीकडे गेला.
दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने विवेक पाण्यात बुडू लागला. त्याच्या मित्रांनाही पोहता येत नव्हते. तरीही त्यांनी विवेकला वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. विवेक नदीत बुडाल्याची माहिती मिळताच शिरवळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक मच्छिमार व नागरिकांच्या मदतीने तब्बल अडीच तासांनंतर विवेकचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.